नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रोडवरील ट्रव्हल बसच्या दुर्घटनेनंतर पोलीस व आरटीओने १४ ऑक्टोंबरपासून खासगी प्रवासी बसची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली. या तपासणीत २२ ऑक्टोंबरपर्यंत ४१० बसमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले अशून त्यांच्याकडून ९ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत आतापर्यंत १०४१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. ही कारवाई यापूढेही सुरू राहणार आहे. ही तपासणी दिंडोरी जकात नाका, पेठ रस्त्यावरील जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, मुंबई – आग्रा महामार्गावर नववा मैल, गौळाणे फाटा आदी सहा ठिकाणी करण्यात येत आहे.
८ ऑक्टोंबर रोजी औरंगाबादरोडवरील कैलास चौफुली भागात चिंतामणी ट्रव्हल्सची प्रवासी वाहतूक करणारी बस आणि कोळश्याने भरलेल्या मालट्रकमध्ये अपघात झाला होता. या अपघातात बसला भिषण आग लागल्याने १२ प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले तर ४३ प्रवाशी जखमी झाले होते. त्यानंतर या घटनेची शासनस्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. एकुणच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूकीचा प्रश्न चर्चेत आल्याने पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग कामाला लागले आहे.