मनीष कुलकर्णी, नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क)
देशाचे पंतप्रधानपद भूषवणार्या व्यक्तीला अभेद्य सुरक्षाकवच प्रदान केले जाते. त्याची संपूर्ण जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) कडे असते. इतर सुरक्षा यंत्रणांकडून त्यांना मदत मिळते. यामध्ये एनसएसजी कमांडो, स्थानिक पोलस, निमलष्करी दलाची तुकडी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचा समावेश असतो. भारताच्या पंतप्रधानांना २४ तास सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी एसपीजीची असते.
पंतप्रधान जिथे कुठे जातात, तिथे एसपीजीच्या अचूक नेमबाजांना प्रत्येक पावलावर तैनात केले जाते. हे नेमबाज एका सेकंदाच्या आत दहशतवाद्यांना मारण्यासाठी सक्षम असतात. या जवानांना अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण दिले जाते. एसपीजीच्या जवानांकडे एमएनएफ-२००० असॉल्ट रायफल, अॅटोमॅटिक गन आणि १७ एम रिव्हॉल्व्हर सारखे आधुनिक शस्त्र असतात.
एसपीजीशिवाय पोलिससुद्धा पंतप्रधानांच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतात. पंतप्रधानांच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये एसपीजीचे प्रमुख स्वतः उपस्थित असतात. एसपीजीचे प्रमुख अनुपस्थित राहिल्यास सुरक्षाव्यवस्थेचे व्यवस्थापन दुसर्या अधिकार्याकडे दिले जाते. पंतप्रधान आपल्या निवासस्थानातून सभेसाठी बाहेर पडतात, तेव्हा पूर्ण मार्गावरील एकतर्फा वाहतूक बंद केली जाते. यादरम्यान मार्गात कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून पोलिसांचे दोन वाहने सायरन वाजवून मार्गावर गस्त करत असतात.
पंतप्रधानांच्या ताफ्यात सुरक्षाकवच असलेल्या २ बीएमडब्ल्यू, सीरिज सेडान ७, बीएमडब्ल्यू एक्स ५ आणि एक मर्सिडिज बेंज रुग्णवाहिकेसोबात एक डझनहून अधिक वाहने दाखल असतात. तसेच एक टाटा सफारी जॅमर ताफ्यासोबत असते. पंतप्रधानांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे पोलिस कर्मचार्यांची वाहने असतात. उजव्या आणि डाव्या बाजूला आणखी दोन वाहने असतात. त्यामध्ये पंतप्रधानांचे सुरक्षाकवच असलेले वाहन असते.
हल्लेखोरांना चकवण्यासाठी पंतप्रधानांच्या वाहनांसारख्याच डमी वाहनाचा ताफ्यात समावेश असतो. जॅमर वाहनावर अनेक अँटिने असतात. हे अँटिने रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेवलेल्या बॉम्बला १०० मीटराच्या अंतरावरूनच निकामी करण्यास सक्षम असतात. या सर्व वाहनांवर एनएसजीच्या अचूक नेमबाजांचा ताबा असतो. पंतप्रधानांसोबत जवळपास १०० रक्षकांचे एक पथकच असते. पंतप्रधान चालताना पोषाखातील जवानांसह साध्या पोषाखातील एनएसजी कमांडो त्यांच्याभोवती सुरक्षा कडे करतात.
मार्गातील प्रोटोकॉल असा
– नेहमी कमीत कमी दोन मार्ग निश्चित असतात
– कोणालाही मार्गाची माहिती ठाऊक नसते
– अंतिम क्षणी एसपीजी मार्ग निश्चित करते
– कोणत्याही क्षणी एसपीजी मार्ग बदलू शकते
– एसपीजी आणि राज्य पोलिसांत समन्वय असतो
– राज्य पोलिसांकडे मार्ग मोकळा करण्याची जबाबदारी असते
– संपूर्ण मार्ग आधीपासूनच मोकळा केला जातो.