इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोविड-१९ लॉकडाउनचे उल्लंघन करणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना चांगलचे भोवले आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डकडून सुनावण्यात आलेला दंड त्यांनीजमा केला असून, माफीही मागितली आहे. जॉन्सन यांनी कोविड निर्बंधांचे उल्लंघन करून डाउनिंग स्ट्रीट येथे पार्टी आयोजित केली होती. “मी दंड भरला असून, मी पुन्हा एकदा माफी मागतो,” असे जॉन्सन यांनी बकिंघमशायर येथे पत्रकारांना सांगितले.
जॉन्सन यांना फिक्स्ड पेनल्टी नोटीस (एफपीएन) जारी केली जाणार आहे, अशी सूचना जॉन्सन आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांना महानगर पोलिसांकडून मिळाली आहे. याबद्दल डाउनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाने पुष्टी केली होती.
बोरिस जॉन्सन यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांनासुद्धा अशी नोटीस मिळाली आहे. पारदर्शी व्यवस्थेच्या हितासाठी त्यांना एनपीएन प्राप्त होणार आहे, असे सूचित केले गेल्याची पुष्टी केली आहे. असे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. एफपीएनच्या स्वरूपाबद्दल त्यांना कोणताही अधिक तपशील मिळाला नाही. म्हणजेच, पंतप्रधानांनी किती दंड भरला हे पोलिस किंवा पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलेले नाही.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आला होता. ब्रिटनचे पंतप्रधान कार्यालय असलेले डाउनिंग स्ट्रीट आणि सरकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांच्या प्रकरणांना पार्टीगेट म्हणूनच ओळखले जाते. सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांना संसदेत माफी मागावी लागली होती.