इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील अग्निपथ योजनेवरुन सुरू असलेल्या वादाची दखल अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी आज सर्वप्रथम यासंदर्भात भाष्य केले आहे. मोदी म्हणाले की, काही निर्णय आणि सुधारणा सुरुवातीला वाईट वाटू शकतात, परंतु ते दीर्घकाळासाठी देशाला फायदेशीर ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही टिप्पणी अग्निपथ योजनेबाबत असल्याचे मानले जात आहे. या योजनेवरुन बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यात हिंसक आंदोलन सुरू आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे अनेक विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले की, अनेक निर्णय आणि सुधारणा याक्षणी अप्रिय वाटत असले तरी दीर्घकाळात देशाला त्याचे फायदे जाणवतात. अनेक दशकांपासून सरकारची मक्तेदारी असलेल्या देशातील तरुणांसाठी आम्ही अवकाश आणि संरक्षण यासारखी अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. आज आम्ही देशातील तरुणांना सरकारने निर्माण केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये त्यांची दृष्टी आणि प्रतिभा तपासण्यास सांगत आहोत. जेव्हा सर्वांना समान संधी दिली जाईल तेव्हाच आपण जगाशी स्पर्धा करू शकतो, असे मोदींनी सांगितले.
बंगळुरूच्या विकास प्रकल्पांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, जी कामे ४० वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवी होती ती आजपर्यंत प्रलंबित आहेत आणि आता ती माझ्या वाट्याला आली आहेत. तुम्ही मला एक संधी दिली आहे आणि आता मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. आजूबाजूचा परिसर रॅपिड रेल्वेने जोडला जाईल, तेव्हा बंगळुरूमधील वाहतूक कोंडीसह सर्व समस्या संपतील. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहनांना बंगळुरूला यावे लागणार नाही. त्यामुळे प्रवासही सुकर होईल आणि बंगळुरूची व्यवस्थाही चांगली होईल.
मोदींनी सांगितले की, गेल्या 8 वर्षात आम्ही रेल्वेचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकला आहे. आता भारतीय रेल्वे जलद, स्वच्छ आणि आधुनिकही आहे. याशिवाय ती सुरक्षितही आहे आणि नागरिकांसाठी अनुकूलही होत आहे. आम्ही ट्रेन देशाच्या अशा भागांमध्ये नेली आहे जिथे विचार करणे देखील कठीण होते. कर्नाटकातही १२०० किमी पेक्षा जास्त रेल्वे मार्ग नवीन किंवा विस्तारित करण्यात आले आहेत. आता रेल्वे सुद्धा विमान प्रवास आणि विमानतळासारख्या सुविधाही पुरवत आहे. नागरिक आता बंगळुरूमधील एम. विश्वेश्वरय्या रेल्वे स्टेशनवर पर्यटनासाठी जातात. आणि तरुणांमध्येही सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली आहे, असे मोदींनी सांगितले.
Prime Minister Narendra Modi on Agneepath Scheme Agnipath Agneevir defence Banglore