नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात कितीही मोठे वाद झाले तरीही त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्तव्य करतील किंवा प्रतिक्रिया देतीलच असे नाही. राष्ट्रीय प्रश्नांवर सभागृहात किंवा एखाद्या मोठ्या सभेत भूमिका घेतातही मात्र वादांवर बोलणे शक्यतो टाळतात. त्यामुळे त्यांनी सनातन वादावर केलेल्या विधानाची देशभर चर्चा होत आहे.
बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होती. एकतर जी२० परीषद आणि दुसरे म्हणजे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणारे विशेष सत्र, या दोन्ही पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीत जी२० परिषदेच्या संदर्भात मंत्र्यांसाठी काही नियमावली सुद्धा पंतप्रधानांनी जाहीर केली. पण यादरम्यान मंत्र्यांसोबत चर्चा करताना त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरही भाष्य केले. तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं.
या भाषणादरम्यान, त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. त्यावर देशभर मोठा वादंग झाला. गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. ‘उदयनिधी यांच्या सनातन धर्माविषयीच्या वक्तव्याला योग्य उत्तर द्यायला हवे,’ अशा आदेश वजा सूचना नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाला केल्या आहेत.
चांदीच्या भांड्यात जेवण
जी-२० शिखर परिषदेला उपस्थित असलेले विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख नेत्यांसाठी चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. या चांदीच्या भांड्यांवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती असतील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. जी-२० परिषदेसाठी २०० कारागिरांनी तब्बल १५ हजार चांदीची भांडी बनविली आहेत. जयपूर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि देशाच्या इतर भागांतील कारागिरांनी या भांड्यांवर कलाकुसर केली आहे.
‘जी-२० इंडिया’ अॅप
केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत वाहनांचा वापर करू नये. भारत मंडपम आणि विविध सभांच्या ठिकाणी जाण्यासाठी शटल सेवेचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना ‘जी-२० इंडिया’ मोबाइल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे. परदेशी मान्यवरांशी संभाषण करताना त्याचे भाषांतर आणि इतर वैशिष्टय़ांचा सर्वोत्तम वापर करण्यास सांगितले आहे. जी-२० इंडिया मोबाइल अॅपद्वारे सर्व भारतीय भाषा आणि जी-२० राष्ट्रांच्या भाषांचे झटपट भाषांतर करण्यात येते.
Prime Minister Narendra Modi MP Ministers BJP Leaders Politics