नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळोवेळी देशवासियांशी अचानक संवाद साधत असतात. कधी कधी ते मोठा धक्का नागरिकांना देतात तर कधी कधी गुडन्यूज. नोटबंदीची घोषणा असो की, लॉकडाऊन किंवा कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय यावेळी त्याचा प्रत्यय देशवासियांना आला आहे. आताही तशी वेळ आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निमित्त आहे ते दक्षिण अफ्रिकेत धुमाकूळ घालत असलेले कोरोनाचा नवा अवतार.
दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटवर चर्चा करण्यासाठी तसेच देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना परिस्थितीवर तसेच नव्या व्हेरिएंटसंदर्भात देशात काय काळजी घ्यावी, याविषयी बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
युरोपीय देशांमध्ये सध्या कोरोनाचा स्फोट झाला असून अनेक भागात लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. युरोपासह रशिया, अमेरिकेतही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या बी.१.१.५२९ या नव्या कोरोना व्हेरिएंटने जगभरात आणखी चिंता वाढविली आहे. दक्षिण अफ्रिकेत या व्हेरिएंटने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दक्षिण अफ्रिकेतून येणार्या प्रवाशांमध्ये बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. इस्रायलमध्येही मलावी येथून आलेल्या एका व्यक्तीला या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्हेरिएंटला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासह दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी मोठ्या अधिकार्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. परदेशातून भारतात येणार्या प्रवाशांबद्दल कोणचे निर्णय घ्यावे, यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नव्या व्हेरिएंटसंदर्भात सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. परदेशातून येणार्या प्रवाशांची चाचणी करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक व्ही या लशींना परवानगी देण्यात आलेली आहे. भारताने शंभर कोटी लशींचा टप्पा पूर्ण केला आहे. परंतु सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी कोणत्या योजना करणे अपेक्षित आहे याचा आढावाही पंतप्रधान घेण्याची शक्यता आहे.