नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीवनशैली, त्यांचे दैनंदिन कार्य, त्यांच्या निरोगीपणाचे रहस्य आदींबाबत सर्वांनाच मोठे कुतुहल आहे. यासंदर्भात खुद्द मोदींनीच दिलखुलासपणे उलगडा केला आहे. ऑलिम्पिकटूंसोबत आयोजित भोजन समारंभात त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यातच अनेक बाबींचा खुलासा झाला आहे.
पंतप्रधान मोदी हे दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात, ही माहिती अनेकांना माहिती नसेल. पंतप्रधान एकाच वेळी का जेवत असतील, याबद्दल तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल. या गोष्टीचा उलगडा स्वतः पंतप्रधानांनीच केला आहे. दिवसातून एकदाच भोजन करण्याची गोष्ट त्यांनी स्वतः सांगितली आहे. सध्या चातुर्मास सुरू झाला आहे. जैन धर्मात चातुर्मासाचे मोठे महत्त्व आहे. परंतु हिंदू धर्माचे लोक चातुर्मासात पूजापाठ आणि धार्मिक विधी करत असतात. हवामान अनुकूल नसल्याने चातुर्मासात दही, हिरवी पालेभाजी, कांदा, लसूण असे अनेक पदार्थ खाल्ले जात नाहीत. तसेच अनेक लोक दिवसातून एकदाच जेवण करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा चातुर्मासादरम्यान दिवसातून एकदाच जेवण करतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यादरम्यान भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला पंतप्रधानांनी त्याचा आवडता पदार्थ चुरा आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला आईस्क्रिम खाऊ घातले. नीरज शर्माला चुरा देण्यात आला, तेव्हा पंतप्रधान म्हणाले की, ‘एकदा माझ्यासोबत चुरा खावा लागणार आहे’. त्यावर नीरजने पंतप्रधानांना ‘तुम्ही सुद्धा घ्या’ अशी विनंती केली. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, ‘चातुर्मास सुरू आहे, त्यामुळे या दिवसात मी एकदाच जेवण करतो’.
अटलजी जेव्हा हैराण होतात…
भारतीय खेळाडूंच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भातील एक किस्सा ऐकवला. ते म्हणाले, की एकदा अटलजी कुठेतरी भोजन करायला गेले होते. तिथे त्यांना गुलाबजामून देण्यात आला. भोजन केल्यानंतर अटलजी जेव्हा बाहेर आले, तेव्ही त्यांनी पत्रकारांशी बोलताना गुलाबजामून आवडतात असे सांगितले. त्यानंतर त्यांना प्रत्येक ठिकाणी भोजनानंतर गुलाबजामून दिले जाऊ लागले. या घटनेनंतर हैराण झालेल्या अटलजींनी एक आदेशच काढायला सांगितला. तो आदेश काय होता की, गुलाबजामून ऐवजी इतर गोड पदार्थ खाऊ घालावेत. पंतप्रधान मोदी यांचा हा किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.