विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्या कोरोनामुळे भारतात लग्नकार्यावर निर्बंध असून केवळ २५ जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडावे लागत आहेत, तर दुसरीकडे मात्र न्यूझीलंडमध्ये चक्क त्या देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या पंतप्रधानाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न (वय ४०) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
दोन वर्षापूर्वी लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये असताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असलेल्या जेसिंडा अर्डर्न यांनी एका बाळाला जन्म दिला असून सध्या त्यांची मुलगी दोन वर्षांची आहे. जेसिंडा आणि त्यांचे बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांनी येत्या उन्हाळ्यात लग्नाचा बार उडण्याचा विचार केला आहे. न्यूझीलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळ्याचा मानला जातो. मात्र हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्डर्न पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्या गरोदर होत्या. त्यापुर्वी काही वर्षांपासून त्या बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. २०१९ मध्ये जेसिंडा आणि क्लार्क यांचा साखरपुडा झाला होता . मात्र आता मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
विशेष म्हणजे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने लग्नाआधी बाळाला जन्म देण्याचे उदाहरण फारसे आढळत नाही. परंतु त्यांच्या देशात याची फारशी चर्चा झाली नाही. मुलीच्या जन्मानंतर अर्डर्न यांचे बॉयफ्रेंड गेफोर्ड यांनी घरी राहून मुलीचा सांभाळ केला, तर अर्डर्न यांनी देशाची धुरा सांभाळली. जेसिंडा या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधानही ठरल्या आहेत. जागतिक व्यासपीठावरही अर्डर्न या लहान मुलीला घेऊन गेल्या होत्या.
(फोटो – द गार्डियन आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या सौजन्याने)