नवी दिल्ली – देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अतिउच्च सुरक्षा पुरविली जाते. त्यामध्ये देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री या पदांवरील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी झेड प्लस सुरक्षेसह बुलेटप्रूफ वाहने पुरविली जातात. देशाच्या पंतप्रधानांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपतर्फे (एसपीजी) सुरक्षा पुरविली जाते. तर इतर ५६ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय राखीव सुरक्षा दलातर्फे (सीआरपीएफ) सुरक्षा पुरविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात आता अतिसुरक्षित नवे वाहन दाखल झाले आहे. त्या वाहनांची वैशिष्ट्ये काय आहे ते जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात आता मर्सिडिज मेबॅक एस ६५० या सुरक्षा आवरणयुक्त वाहनाचा समावेश झाला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भेटण्यासाठी ते नुकतेच नव्या मेबॅक एस ६५० या वाहनातून प्रथमच हैदराबाद हाउस येथे आले होते. पंतप्रधानांच्या ताफ्यात या कारचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
Mercedes-Maybach S650 Guard VR10 हे वाहन अत्याधुनिक उच्चसुरक्षा असलेले मॉडेल आहे. आतापर्यंत कोणत्याच उत्पादित वाहनात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी मर्सिडिज-मेबॅकने भारतात एस६०० गार्ड या १०.५ कोटी रुपयांच्या वाहनाचे अनावरण केले होते. तर एस६५० या वाहनाची किंमत १२ कोटी रुपयांहून अधिक असू शकते.
देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष सुरक्षा पथक म्हणजेच एसपीजी यांच्याकडून सुरक्षा आवश्यकतांची पाहणी करण्यात येते. ज्या व्यक्तीची सुरक्षा करण्यात येत आहे, त्यांना नव्या वाहनाची गरज आहे किंवा नाही याबद्दलचा निर्णय एसपीजीकडूनच घेण्यात येतो.
वाहनाची वैशिष्ट्ये
१) Mercedes-Maybach S650 Guard हे वाहन ६.० लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिनाद्वारे संचालित केले जाते. हे इंजिन ५१६ बीएचपी आणि जवळपास ९०० एनएमचा पिक टॉर्क निर्माण करते. वाहनाची कमाल वेग मर्यादा १६० किमी प्रतितास इतकी मर्यादित आहे.
२) S650 Guard बॉडी आणि खिडक्या कठोर स्टिल कोअर बुलेटचा सामना करू शकतात. या वाहनाला स्फोटरोधक (ईआरव्ही) ची रेटिंग मिळाली आहे. या वाहनातून प्रवास करणारे नागरिक दोन मीटर अंतरावरिल १५ किलो टीएनटी स्फोटातही सुरक्षित राहू शकतात.
३) कारच्या खिडकीच्या आतील भागात पॉली कार्बोनेटचा थर लावण्यात आला आहे. कारचा खालील भागही स्फोटविरोधी आवरणाने तयार केलेला आहे. वायू हल्ला झाल्यास कारच्या केबिनमध्ये एक ऑक्सिजन पुरवठा करणाची यंत्रणाही आहे.
४) या कारच्या इंधन टँकला एका विशेष सामग्रीचे आवरण लावण्यात आले आहे. या आवरणाने टँकवरील पडणारी छिद्रे आपोआप बंद होतात. बोईंग एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टद्वारे टँकवर हल्ला करण्यासाठी वापण्यात येणार्या सामग्रीचा वापर या कारच्या इंधन टँक बनविण्याठी केला जातो.
५) ही कार विशेष रन-फ्लॅट चाकांवर धावते. नुकसानग्रस्त झाल्याच्या स्थितीत तिचे चाके सपाट होतात. कारमध्ये सीट मसाजर असून एक शानदार इंटिरिअर आहे. लेगरूम वाढविण्याचीही सुविधा आहे. कारचे मागील सिट बदलण्यात आले आहेत.
६) गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये प्रवास केला होता. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी बीएमडब्ल्यू ७ सीरिजची उच्च सुरक्षायुक्त कार वापरली होती.