मुंबई – दिवाळीनंतर राज्यातील पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळाही सुरू होण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास राज्यातील सर्वच्या सर्व वर्ग आणि शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत आली आहे. तसेच, लसीकरणाचा वेगही वाढला आहे. सध्या लसीचा पुरवठाही मुबलक आहे. त्यामुळे लसीकरणाचा चक्काही वाढत आहे. त्यातच येत्या काही दिवसात लहान मुलांसाठीही लस येणार असल्याने दिवाळीनंतर प्राथमिक शाळा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक श्री.टेमकर, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण, आदीसह सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा योजनेची आणि संबंधित जिल्ह्यांमध्ये निजामकालीन शाळांच्या विकासाच्या कामांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागातील शाळांच्या देखभालीचा निधी वितरीत करण्यात येईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे, काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यास सहकार्य करण्यात येईल. शाळा दुरूस्तीसाठी नियोजन आवश्यक असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निधी उभा करावा. जिल्ह्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती त्वरीत सादर करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
ह्या आव्हानात्मक काळात आपल्या शाळा मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (CEO) बैठकीत सुरु झालेल्या शाळांचा जिल्हानिहाय आढावा,त्याअनुषंगाने तयारी,लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला. pic.twitter.com/cMFiFbcnVn
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 22, 2021
अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, आदर्श शाळा योजनेसंदर्भात आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. हे करण्यासाठीच्या कामासाठी निधी मंजूर असून, लवकरच वितरीत करणार आहे. संबंधित जिल्ह्यांनीही विविध उपाययोजना आखाव्यात, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.