मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 लाख (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दि. 16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 93 लक्ष रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय दिनांक ७ मार्च २०२२ रोजी महसूल व वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील ४९२ शाळांसाठी ७ कोटी ३८ लाख, ठाणे जिल्ह्यातील ७० शाळांसाठी ७३ लाख, रत्नागिरी जिल्ह्यातील २६८ शाळांसाठी १ कोटी १६ लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २०९ शाळांसाठी ५८ लाख, पालघर जिल्ह्यातील १६४ शाळांसाठी १ कोटी २० लाख,पुणे जिल्ह्यातील २२ शाळांसाठी २४ लाख,सातारा जिल्ह्यातील २६ शाळांसाठी २६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ शाळांसाठी ६४ लाख,नंदूरबार जिल्ह्यातील १० शाळांसाठी ४ लाख,नाशिक जिल्ह्यातील ६१ शाळांसाठी ६४ लाख,धुळे जिल्ह्यातील २ शाळांसाठी २ लाख रुपये असे एकूण रु. 12 कोटी 93 लक्ष 24 हजार (अक्षरी बारा कोटी त्र्यान्नव लक्ष चोवीस हजार फक्त) रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात आला आहे.