पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांना त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलवरही आरोप केले. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला उत्तर दिले. यावेळी पाटील म्हणाले की, कायद्याची लढाई कायद्याने लढायला हवी, ती कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे आहे, पण ईडीला फेस करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुश्रीफ यांनी केलेल्या आऱोपावर बोलतांना ते म्हणाले की, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप मुश्रीफांनी केला. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता ८ झालेत. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेले पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष एकत्र आल्यामुळे ती त्यांच्याकडे गेली. यावेळी त्यांनी मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझे नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणे ही मित्र या नात्याने माझी जबाबदारी असल्याचा चिमटाही पाटील यांनी काढला.