मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केले. भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या संपूर्ण मोहिमेची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील व्योमिका सिंग, लष्करातील कर्नल सौफिया कुरेशी यांनी दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमधील वाढतं पर्यटन आणि चांगली होत असलेली अर्थव्यवस्था यांच्यावरती परिणाम करण्यासाठी पहलगाममध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा उद्देश विकास आणि प्रगती थांबवून राज्याला मागास करणे होता. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहाभाग उघड आहे. स्वतःला रेझिस्टन्स फ्रंट म्हणवणाऱ्या एका गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा गट संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाचा एक गट आहे… पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीतून पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या संप्रेषण नोट्स समोर आल्या आहेत.
विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणतात, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले आणि यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले… नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांचा जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते नष्ट करण्यात आले. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.