नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते लष्करी तसेच नागरी सेवेतील व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यामध्ये पद्म पुरस्कार तसेच लष्करातील पुरस्कारांचा समावेश असतो. परंतु यंदा व्यक्तींप्रमाणेच एका प्राण्याचा देखील सन्मान करण्यात आला. हा प्राणी म्हणजेच राष्ट्रपतींच्या अंगारक तथा संरक्षक ताफ्यातील अश्व होय.
सन १९५० पासून भारतातील विविध राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ अंगरक्षक म्हणून अश्व दलाचा समावेश करण्यात आला आहे, हे दल राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा विशिष्ट मार्गावरून जात असताना त्यांच्या मागे आणि पुढे असतो. या ताफ्यातील हा अश्व होय. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या ताफ्यातील खास घोडा ‘विराट’ला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा ‘चार्जर’ म्हणून विशेष सन्मान दिला आहे.
विराटला त्याच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्ड देण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यातील विराट हा पहिला घोडा आहे, ज्याला हे सन्मानपत्र मिळाले आहे. विराटला त्याच्या निस्वार्थी आणि अतुलनीय सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. विराटला गेल्या १३ वर्षांपासून भारताच्या माजी राष्ट्रपतींना तसेच विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान आहे. परेड दरम्यान विराट हा सर्वात विश्वासू घोडा मानला जातो. आजपासून हा घोडा सेवानिवृत्त झाला. त्यानिमित्ताने त्याचा हा अनोखा सन्मान झाला आहे.
https://twitter.com/mvmeet/status/1486255607951028225?s=20
हा सामान्य घोडा नसून देशाच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक परिवारातील एक विशेष घोडा आहे. विराट सन २००३ मध्ये हेमपूरच्या रिमाउंट ट्रेनिंग स्कूलमधून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलात सामील झाला होता. होनोव्हेरियन जातीचा हा घोडा, त्याच्या नावाप्रमाणेच, अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक उंचीचा आहे. सन २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेड आणि बीटिंग द रिट्रीट समारंभात वृद्ध असतानाही घोड्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती, विराटला विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान मिळाला आहे, असे विराटबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले.