जकार्ता – इंडोनेशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षा सुकर्णो यांची मुलगी सुकमावती सुकर्णोपुत्री यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. २६ ऑक्टोबरला त्या एका पूजेत सहभागी होऊन हिंदू धर्म स्वीकारतील. सीएनएन इंडोनेशियाच्या एका वृत्तात ही माहिती देण्यात आली. सुकर्णो हेरिटेज एरियामध्ये मंगळवारी हा कार्यक्रम होणार आहे.
सुकमावती या माजी राष्ट्राध्यक्षा सुकर्णो यांची तिसरी मुलगी आहेत. माजी राष्ट्राध्यक्षा मेगावती सुकर्णोपुत्री या त्यांच्या लहान बहीण आहेत. ७० वर्षीय सुकमावती सुकर्णोपुत्री इंडोनेशियामध्येच राहात आहेत. मूलतत्ववादी मुस्लिम धार्मिक समुहांनी २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध ईशनिंदा केल्याची तक्रार केली होती.
सुकमावती यांनी एक कविता शेअर केली होती. त्यात त्यांनी मुस्लिम धर्माचा अपमान केल्याचा आरोप कट्टरपंथी गटांनी केला आहे. या घटनेनंतर सुकमावती यांनी माफी मागितली होती. परंतु त्यानंतरही वाद संपण्याची चिन्हे दिसले नाही. त्यांच्यावर टीका सुरूच होती. इंडोनेशियामध्ये मुस्लिम अनुयायांची संख्या अधिक आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशियात आहे. सुकमावती यांचे वडील सुकर्णो यांच्या दौर्यादरम्यान भारत आणि इंडोनेशियाचे संबंध चांगले होते.
सुकमवातीचे वकील व्हिटारियोनो रेजसोप्रोजो म्हणाले, की सुकमावती आजीमुळे धर्मांतर करत आहेत. सुकमावती यांनी हिंदू धर्माबद्दल खूप अभ्यास केला आहे. बाली येथील हिंदू धर्मांच्या कार्यक्रमात नेहमीच सहभागी झाल्या आहेत. २६ ऑक्टोबरला बाली अगुंग सिंगराजामध्ये शुद्धी वदानी नावाचा कार्यक्रम होणार आहे. तिथेच त्या हिंदू धर्म स्वीकारतील. माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी याला मान्यता दिली आहे. त्यांना अनेक वर्षांपासून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा होती.