रायगड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज स्वराज्याची राजधानी रायगडावर येत आहेत. गेल्या ३६ वर्षांनंतर प्रथमच देशाचे राष्ट्रपती रायगडावर येणार आहेत. यापूर्वी १९८५ साली तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. शिवप्रेमींच्या भावनेचा सन्मान करत राष्ट्रपती रोप वेच्या माध्यमातून येणार आहेत. खासदार छत्रपती संभाजी यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगट भेटीदरम्यान होळीच्या माळावर हेलिपॅड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शिवप्रेमींनी त्याला विरोध केला होता. त्यांच्या भावनांचा आदर राखत राष्ट्रपती रोप वेने रायगडावर येणार आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीस्थळावरील काही अंतरावर हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन होणार आहे. तिथून ते हिरकणीवाडी येथे पोचतील. तिथून ते सव्वा बाराच्या सुमारास रोप वेने रायगडावर दाखल होणार आहेत. आधी ते जगदिश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट
यापूर्वी १९८० साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या. तर १९८५ साली राजसदरेवर उभारण्यात आलेल्या मेघडंबरीचे अनावरण करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगडाला भेट दिली होती. त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले २ रुपयांचे नाणे केंद्र सरकारने जारी केले होते. भारताच्या इतिहासात राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवरील व्यक्तींनी भेट दिलेला रायगड हा एकमेव किल्ला आहे.
चोख पोलिस बंदोबस्त
दरम्यान, राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पर्यटकांवर रायगडावर येण्यास ३ ते ७ डिसेंबर या काळात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रस्ता तसेच नातेगाव ते पाचड मार्ग बंद करण्यात आला आहे.