नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याची घोषणा केली आहे. 18 जुलै रोजी देशाच्या नवीन राष्ट्रपतीसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी 15 जूनपासून अधिसूचना लागू होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 29 जूनपर्यंत असेल. 30 जूनपर्यंत त्यांची छाननी केली जाईल आणि उमेदवार 2 जुलैपर्यंत त्यांचे अर्ज परत करू शकतील. 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून नवीन राष्ट्रपती २५ जुलैपर्यंत शपथ घेणार आहेत. 2017 मध्ये, 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली, ज्यामध्ये राम नाथ कोविंद निवडून आले. त्यावेळी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना जवळपास 65 टक्के मते मिळाली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मतदान करण्यासाठी 1,2,3 लिहून निवड व्यक्त करावी लागेल. मतदान करणाऱ्या खासदार व आमदाराने पहिली पसंती न दिल्यास मतदान रद्द मानले जाईल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 4 हजार 809 मते पडणार आहेत. एकूण मतांची किंमत 10 लाख 98 हजार 803 असेल. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा खासदार मतदान करणार आहेत. याशिवाय विधानसभेच्या सदस्यांनाही मतदान करता येणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार आणि 4,120 आमदार मतदानात सहभागी होणार आहेत.