इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती ज्या कार्यक्रमात असेल तिथे अचानक लाईट जाणे, माईक खराब होणे अश्याप्रकारच्या अडचणींना स्कोप नसतो. आणि चुकीने असे काही झाले तर मग जे जबाबदार आहेत त्यांची काही खैर नाही असेच समजा. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात असाच काहीसा प्रकार घडला आणि पुढे जे व्हायचे तेच झाले.
ओडिशा येथील महाराजा श्री रामचंद्र भंजदेव विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रमुख अतिथी होत्या. राष्ट्रपती येणार म्हणून संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली. वीज विभागासह सर्व सरकारी विभागांना सूचना देण्यात आल्या. पण राष्ट्रपतींचे भाषण सुरू झाल्यावर अगदी थोड्याच वेळात लाईट गेले आणि सगळ्यांना घाम फुटला. पण द्रौपदी मुर्मू शांतपणे बोलत राहिल्या. त्यांनी भाषण थांबवले नाही.
सकाळी ११.५६ ते दुपारी १२.०५ या नऊ मिनिटांच्या कालावधीत त्यांचे भाषण सुरू असताना वीज पुरवठा खंडीत होता. उलट सभागृहातील अंधाराचा आणि माईक बंद असल्याचा उल्लेख त्यांनी अतिशय रंजकपणे केला. ‘आजचा हा सोहळा बघून विजेलाही हेवा वाटला असावा. असो. आपण अंधारात बसलो आहोत, पण अंधार आणि उजेड दोन्ही सोबत घेऊन येऊ,’ असे म्हणत त्यांनी सर्वांची मने जिंकली. आणि तिकडे प्रशासनाला घाम फोडला. यावेळी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल देखील उपस्थित होते. घडलेल्या प्रकाराबद्दल जनसंपर्क विभाग आणि वीज विभागाने दिलगिरी व्यक्त केली.
चौकशी तर होणारच
वीज विभाग आणि जनसंपर्क विभागाने दिलगिरी व्यक्त केली असली तरीही एवढ्या मोठ्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने त्याची चौकशी तर होणारच. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तीला काय शिक्षा होते, याची उत्सुकता लागलेली आहे.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1654733495502278656?s=20
President Murmu Speech Electricity Supply Interrupt