मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, ५ सप्टेंबर २०२३ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ७५ निवडक शिक्षकांना वर्ष २०२३ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करणार आहेत. ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा उद्देश आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख ५० हजार रुपये आणि एक रौप्य पदक, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच शिक्षकांचा समावेश आहे. शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजले, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ.राघवन बी.सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील हस्तकला शिक्षिका स्वाती योगेश देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.
कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी शिक्षक दिनी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी ५० शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील १३ शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या १२ शिक्षकांना या पुरस्काराने पुरस्कृत केले जाईल.
नवनवीन अध्यापन पध्दती, संशोधन, समाजापर्यंत पोहोचणे आणि कार्यातील नाविन्य ओळखण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त जनसहभाग (जन भागीदारी) करून घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने यावर्षी नामांकने मागवली गेली होती. या शिक्षकांच्या निवडीसाठी तीन प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या स्वतंत्र राष्ट्रीय स्तरावरील निवड समितीची स्थापना यावर्षी माननीय शिक्षणमंत्र्यांनी केली होती.
President of India to confer National Teachers’ Award 2023 to 75 selected teachers on 5th September 2023