राष्ट्रपती निवडणूक एक दृष्टीक्षेप
येत्या १८ जुलै 2022 रोजी होणारी भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही भारतात होणारी 16वी राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, सध्या राम नाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मधील तरतूदी नुसार भारताचे राष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यामुळे , कार्यालय भरण्यासाठी निवडणूक मतदान 18 जुलै 2022 रोजी होणार आहे आणि मतमोजणी 21 जुलै 2022 रोजी होणार आहे. 21 जून 2022 रोजी, भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांची एकमताने यूपीएचे सामान्य उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहेआणि 2022 च्या राष्ट्रपती तर एनडीएने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मूंची निवड केली आहे.
17 जुलै 2017 रोजी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताच्या घटनात्मक प्रमूख असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होत झाली होती, सत्तारुढ भाजप आणि मित्रपक्षाचा उमेदवार म्हणून विहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद आणि काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यात सरळ लढत झाली होती. राष्ट्रपती पदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद सहजपणे निवडून आले होते. तर मीरा कुमार यांना हार पत्करावी लागली होती.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशी होते
राष्ट्रपतीपदासाठी पात्रता
३५ वर्षे वयाचा भारताचा नागरिक,केंद्रात किंवा राज्यात कोणत्याही फायद्याच्या पदाचा (office of profit) वापर न केलेला व्यक्ती भारताचा राष्ट्रपती बनू शकतो पण त्यासाठी ५० सदस्यांनी(खासदार,आमदार)सूचक,अनुमोदक करणे गरजेचं आहे.
हे असतात मतदार
या पदासाठी दोन्ही संसदेचे खासदार आणि सर्व राज्यांचे विधान सभेचे (विधान परिषदेचे नाही) आमदार मतदान करतात.पण प्रत्येक राज्यातील आमदारांचे मतमूल्य (Value of Vote) वेगळे असते.
असे असते मतांचे मूल्य
सदस्यांच्या मतांचे मूल्य राज्यघटनेच्या ५५(२) कलमानुसार ठरवले जाते.
सुरुवातीला आपण मतदान करणारे एकूण किती सदस्य असतात हे बघूया म्हणजे मतांचे मूल्य समजायला सोप्प जाईल.
लोकसभेचे ५४३ आणी राज्यसभेचे २३३ असे एकूण ७७६ खासदारांची संख्या आहे आणी सर्व राज्यातील (पोंडेचरी,दिल्लीसह) आमदारांची संख्या ४१२० आहे.
खासदार + आमदार = एकूण मतदार
७७६ + ४१२० = ४८९६
आमदारांचे मतमूल्य
(आमदारांची लोकसंख्या × एक हजार ÷ राज्याची लोकसंख्या = एका आमदाराचे मतमूल्य)
उदा.महाराष्ट्राची लोकसंख्या ५,०४,१२,२३५ आहे.(१९७१ची घेतली जाते)व आमदारांची एकूण संख्या २८८ आहे.इथे
२८८ X १००० = २८८००० या संख्येने एकूण लोकसंख्येला भागले असता १७५.०४२ हे उत्तर येते म्हणून महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचे मूल्य १७५ आहे.म्हणजेच आमदार × मतमूल्य = राज्यनिहाय मतदान (२८८ × १७५= ५०४००)याचा अर्थ महाराष्ट्राचे मतदान ५०४०० एवढे आहे.याच पद्धतीने प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्यमूल्य काढून राज्याचे एकूण मतदान ठरवले जाते.यात उत्तर प्रदेशच्या एका आमदाराचे मतमूल्य सगळ्यात जास्त म्हणजे २०८ आहे तर सिक्कीमच्या आमदाराचे सगळ्यात कमी म्हणजे ७ आहे.
खासदारांचे मतमूल्य
(सर्व आमदारांचे मतमूल्य ÷ सर्व खासदार = १ खासदाराचे मतमूल्य)
भारतातील सर्व आमदारांचे मतमूल्य ५४९४७४ आहे.
५४९४७४ ÷ ७७६ = ७०८ म्हणजेच एका खासदाराचे मतमूल्य ७०८ इतके आहे.आता खासदारांच्या संख्येला मतमूल्याने गुणले असता एकूण मतदान मिळेल.
७७६ × ७०८ = ५४९४०८
(आमदार मतमूल्य + खासदार मतमूल्य = एकूण मतदान)
५४९४७४ + ५४९४०८ = १०९८८८२
ज्या उमेदवाराला यातील ५०% मते पडतील तो राष्ट्रपती घोषित केला जातो.ही निवडणूक पदवीधर आमदार निवडणुकीसारखी असते जर उमेदवाराची संख्या जास्त असेल व कोणालाच ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नसतील तर सगळ्यात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते दोन क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला वर्ग केली जातात.तरी आकडा गाठता आला नसेल तर खालून क्रमाक्रमाने उमेदवार बाद करत राष्ट्रपती घोषित करता येतो.
– विजय पवार (निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक) मोबाईल 9822114955
President election Voters Value Detail Info