मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रचंड संकटात असलेल्या शिवसेनेने अखेर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय घेतला आहे. भाजपच्यावतीने द्रोपदी मूर्मू या उमेदवार आहेत. तर, विरोधी पक्षांनी अर्थतज्ज्ञ यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आहे. तसेच, सिन्हा यांच्या निवडीसाठी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीला सेनेचे सुभाष देसाई उपस्थित होते. मात्र, पक्षांतर्गत नुकतीच उफाळलेली बंडाळी आणि खासदारांनी केलेल्या मागणीच्या जोरावर अखेर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपती पदाची निवडणूक दि. १८ जुलैला होणार असून यासाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक एकतर्फी होईल असेही दिसत आहे. अशात द्रौपदी मुर्मू यांचा विजय सोपा कसा होईल यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. जास्तीत जास्त पक्षांचा पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना मिळावा, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रपतीपदाचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहता या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने उभा केलेल्या उमेदवारालाच विजय मिळाला आहे. मात्र काही वेळा अपवादात्मक परिस्थितीत विरोधकाच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केल्याचेही दिसून येते. नंतर मात्र ही परंपरा खंडीत झाली, इतकेच नव्हे तर उपराष्ट्रपती असलेल्या व्यक्तीच राष्ट्रपतीपदासाठी निवडून येत असत, त्यानंतर मात्र ही परंपरा देखील मोडीत निघाली.
आतापर्यंतच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मित्र पक्षांच्या उमेदवाराला डावलून शिवसेनेने वेगळी भूमिका घेतलेली दिसून येते. विशेषतः शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि महाराष्ट्रातील मराठी उमेदवार म्हणून प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आता मात्र शिवसेनेत उभी फूट पडली असून शिवसेनेचा एक गट भाजपाबरोबर गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे हे भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का? हा प्रश्न होता. यावरून विविध अंदाजही वर्तवले जात होते.
https://twitter.com/ShivsenaComms/status/1546827402739073025?s=20&t=jQr0ivNaBMZZcJIgmjQvoQ
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदारही फुटणार अशी चर्चा रंगायाला लागली होती. अखेर शिवसेना आपलं वजन द्रौपदी मुर्मू यांच्याच पारड्यात टाकणार आहे.
मातोश्री बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला आपले समर्थन देणार यावर चर्चा झाली. या बैठकीत १९ पैकी ११ खासदार उपस्थित होते. या बैठकीत बहुतांश खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा द्यावा ही विनंती उद्धव ठाकरेंना केली होती.
दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आली आहे. आता या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.
शिवसेनेचे १८ लोकसभा सदस्य आहेत. द्रौपदी मुर्मू या १४ जुलैला मुंबईत येत आहेत. भाजप व शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. मुर्मू यांना पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या खासदारांमधील फूटही उद्धव ठाकरे यांना टाळता येईल. त्यामुळे लोकसभेतील पक्ष एकसंध राहावा म्हणूनही ते मुर्मू यांना पाठिंबा देणार आहेत, असे म्हटले जाते. शिवसेनेच्या ११ खासदारांनी अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि हे खासदार लोकसभेत वेगळा गट स्थापन करणार असल्याचीही चर्चा आहे.
President election Shivsena Decision Uddhav Thackeray