मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतीपदी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांची निवड झाली असून त्यांनी युपीए आणि उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. ही निवड झाल्यानंतर आता या मतदानाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही येत्या काळात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्रातून २०० मते मिळतील असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यात त्यांना यश आले का, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटली का, या प्रश्नांची उत्तरे निकालानंतर मिळाली आहेत.
एकनाथ शिंदे यांचा गट, भाजपा यांच्या व्यतिरिक्त शिवसेना खासदारांच्या भूमिकेमुळे या तिघांनीही द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्याव्यतिरिक्त द्रौपदी मूर्मू यांना राज्यातील १६ जास्त आमदारांची मते मिळाल्याची माहिती आहे. भविष्यात राज्याच्या राजकारणात यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भविष्यातील बदलत्या राजकारणाचे संकेतच यातून मिळाल्याचे म्हणले जात आहे.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फोडल्याचा संशय आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा डाव असल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटलेली १६ मते ही काँग्रेस-राष्ट्रवादीतील असल्याचाच संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. कारण शिवसेनेने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. देशभरात १०४ आमदरांची मते फुटली असून, ते क्रॉस वोटिंग द्रौपदी मुर्मु यांना मिळाली आहेत. त्यातील १६ मते राज्यातील आहेत. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून २०० मते मिळतील, असा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यात भाजपा १०६, शिंदे गट ५० असे मिळून १७० जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची १६ मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळी संख्या १८५ च्या आसपास जाते. २०० चा अंदाज शिंदे यांनी वर्तवला होताच. त्यामुळे त्यांच्या अपक्षेप्रमाणे १६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनीही हे संकेत आधी दिले होते, मात्र त्यांनी ठराविक संख्या सांगितली नव्हती. द्रौपदी मुर्मु या आदिवासी असल्याने त्यांना इतर पक्षातून मतदान होईल, आमदार ते सदसदविवेकबुद्धीने करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीत व्हीप नसतो. तसेच गुप्त मतदान असल्याने आता मते नेमक कुणाची फुटली हे समोर येणे तितके सोपे नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीलाच आता ते शोधावे लागणार आहे.
President Election Result Maharashtra Votes Rebel Shinde Congress NCP