मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी महाराष्ट्रात होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार आणि खासदारांची भेट घेतली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर त्या गेल्या नाहीत. विशेष म्हणजे, शिवसेना मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे. मुर्मू मातोश्रीवर का गेल्या नाहीत, त्यामागे भाजपचे राजकारण काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘मातोश्री’कडे दुर्लक्ष करण्यामागे भाजपची रणनीती असल्याचे मानले जात आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे बॅकफूटवर असताना आणि शिवसेनेत मोठी फूट पडत असताना भाजपला उद्धव यांना जास्त भाव द्यायचा नाही. उद्धव यांनी बोलविलेल्या बैठकीत खासदारांनी मागणी केली की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा. या दबावाखाली उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
पाठिंब्याच्या या निर्णयानंतर शिवसेनेची पुन्हा भाजपशी जवळीक होण्याची ही नांदी ठरू शकते, अशी अपेक्षा होती. पण हे अंदाज आता खोटे ठरताना दिसत आहेत. उद्धव यांची भेट न घेता द्रौपदी मुर्मू परतल्या आहेत. त्यावर भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘मूर्मू यांचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. त्यांच्या सर्व सभा आधीच ठरलेल्या होत्या. अशा स्थितीत शेवटच्या क्षणी योजना बदलणे त्यांच्यासाठी अवघड होते. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून सध्या १६४ आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यातील एकूण ४८ खासदारांपैकी २३ खासदार हे एकट्या भाजपचे आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेची संख्या १९ आहे.
पक्षाच्या अंतर्गत दबावाखाली उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा दिल्याचे भाजपच्या रणनीतीकारांचे मत आहे. त्यांचा पाठिंबा हा भाजपशी चांगल्या संबंधांसाठी उपयुक्त नाही. अशा स्थितीत उद्धव यांना भाव देऊन आणि स्वतः पुढाकार घेऊन भाजपला स्वत:ची किंमत कमी करायची नाही. याशिवाय ठाकरे कुटुंबाशी असलेले संबंध कमी करण्याचीही त्यांना घाई नाही.
२०१९ मध्ये आपली बाजू सोडून महाविकास आघाडी बनवणे ही चूक होती, याची जाणीव उद्धव यांना प्रकर्षाने करून द्यायची आहे. त्यामुळेच आधी एकनाथ शिंदे यांना फोडून भाजपने स्वार्थ दाखवला आणि आता मुर्मू यांना उद्धव ठाकरेंच्या घरी न पाठवून भावनाही दाखवल्या आहेत.
उद्धव ठाकरेंशी संवाद साधण्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हल्लाबोल करण्याची भाजपची सध्याची रणनीती आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून सतत सांगावे आणि दोघांमधील संघर्षात पक्ष कमकुवत करावा, अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे एकीकडे भाजप बळकट होईल तर दुसरीकडे शिवसेना आपोआप कमकुवत होईल. त्यामुळेच राज्यात स्थापन झालेले सरकार शिवसेनेचे असून आम्ही खर्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले, असे भाजप सातत्याने सांगत राहिल. अशा प्रकारे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा वारसा दोन्ही हिसकावून घेण्याची रणनीती भाजपने तयार केली आहे.
President Election Candidate Draupadi Murmu Matoshri Visit BJP Politics