नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक पक्षांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे. नुकतेच झारखंड मुक्ती मोर्चानेही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्ष विरुद्ध एनडीएच्या युद्धात अनेक आघाड्यांची बिघाडी होताना दिसत आहे. महाराष्ट्रापासून झारखंडपर्यंत अनेक प्रमुख पक्षांचे मत त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा वेगळे आहे. विशेष म्हणजे पाठिंब्याबाबत आघाड्यांमध्ये फूट पडली तर त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसू शकतो. भाजपने अत्यंत चलाखीपूर्वक मुर्मू यांना उमेदवारी देऊन अनेक निशाणे साधले आहेत.
महाराष्ट्र
जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सुरू झालेले राजकीय संकट अखेर आता ओसरू लागले आहे. या संकटात महाविकास आघाडी सरकारचा बळी गेला आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी होतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडीही जवळपास तुटल्यात जमा आहे. शिवसेना सरकारचे नेतृत्व करत होती आणि आता तीच शिवसेना फुटली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीतील शिवसेना या घटक पक्षाने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान न करण्याचे निश्चित केले आहे. परिणामी, ही बाब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पटलेली नाही.
झारखंड
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे आघाडीचे सरकार आहे. याचे नेतृत्व झामुमोकडे आहे. आता काँग्रेस आणि झामुमोमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत त्याची सुरुवात झाली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संयुक्त उमेदवार उभे करण्याच्या विनंतीकडे झामुमोने दुर्लक्ष केले. पक्षाने महुआ मांझी यांना उमेदवारी दिली होती.
आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत दोन्ही पक्षांमधील दरी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. कारण, झामुमोने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘तुम्हा सर्वांना माहिती आहे की झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार आहेत, त्याही आदिवासी महिला आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदी निवड होण्याचा मान मिळाला आहे. योग्य विचार केल्यानंतर पक्षाने द्रौपदी मुर्मूंच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश
राज्यात सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी होणार याबाबत काहीही निश्चित नाही. गुरुवारीही भेट म्हणून कार देण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये नवा वाद सुरू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, सुभासप प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राजभर यांनी सांगितले की ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला देखील उपस्थित होते, ज्यामध्ये मुर्मू देखील उपस्थित होत्या.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत, सुभासपचे प्रवक्ते पीयूष मिश्रा यांनी यापूर्वी सांगितले होते की, ‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या बैठकीला सपाने आम्हाला निमंत्रित केले नाही, ज्यामध्ये विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा उपस्थित होते. आता तुम्ही अंदाज लावू शकता की जर आम्हाला बोलावले नाही तर आमच्यासाठी दुसरा कोणता मार्ग उरला आहे.’ आघाडीबाबत ते म्हणाले, आघाडीचे भवितव्य सपाने ठरवायचे आहे. नाहीतर राम राम, जय सिया राम.’
सपाने २०२२च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका आरएलडी, सुभासप, महान दल, प्रगतीशील समाजवादी पार्टी-लोहिया, अपना दल (कम्युनिस्ट) आणि जनवादी पार्टी यांच्यासोबत आघाडी करून लढल्या होत्या. पीएसपी-एल प्रमुख शिवपाल यादव यांनी आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी, महान दल आणि जनता पक्ष (समाजवादी) सपापासून वेगळे झाले आहेत. आणि आता सुभासपही वेगळा झाला आहे.
काँग्रेसला सर्वाधिक फटका!
या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पंजाब, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तर, झारखंड आणि महाराष्ट्र हे सिंहासन असलेल्या आघाडीचा भाग होते. पंजाबमधील पराभव आणि महाराष्ट्रातील बंडानंतर वर्षाच्या मध्यापर्यंत पक्ष सत्तेबाहेर गेला आहे.
आता संबंधांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणुकीत एकटे उतरण्याचा आग्रह धरत आहेत. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर प्रश्न उपस्थित केले होते. अनेक बड्या नेत्यांनी सांगितले की ठाकरे निर्णयांबाबत काँग्रेसशी बोलत नाहीत. त्याचवेळी काँग्रेसने राष्ट्रवादीवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे की झामुमोने त्यांच्या मंत्री आणि आमदारांचा आदर केला नाही. अहवालानुसार, काही आमदारांसह काँग्रेस नेत्यांचा एक गट सरकारमधून माघार घेण्याच्या आणि केवळ बाहेरून पाठिंबा देण्याच्या बाजूने आहे, परंतु काँग्रेसचे चार मंत्री आपली पदे आणि सुविधा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे आघाडीत बिघाडी निश्चित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
President Election BJP Strategy Politics Alliance break up States