नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – असे म्हणतात की, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असते. सध्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच परिस्थिती जाणवत आहे, सर्व नीती नियम आणि कायदे बाजूला ठेवतच सत्ता हस्तांतरणासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी ४२ पेक्षा जास्त आमदारांचा गट तयार केला आहे. भाजपच्या मदतीने सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यामागे राष्ट्रपती पद निवडणूक असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
खरगे म्हणाले की, भाजपला काहीही करुन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायची आहे. यासाठी भाजपने आता महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपला राष्ट्रपती पदासाठी आकडा हवा आहे. राष्ट्रपती पद निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराचा दणदणीत विजय व्हावा यासाठीचे संख्याबळ वाढविण्यावर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. पण भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मला वाटते असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक, मणिपूर, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यातही या अगोदर असेच प्रयत्न झाले आहेत, अशाच पद्धतीने त्यांनी सरकार पाडले आहेत. आमदारांना ईडीची भीती दाखवून त्यांना फोडले जातात. महाराष्ट्रातही सध्या हेच सुरू आहे, पण ते महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, असेही खरगेही म्हणाले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचा सत्तेसाठी खेळ चालला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारचा नीट कारभार सुरू असताना ते अचानक अस्थिर कसे झाले? त्यामागे भाजपचे षड्यंत्र आहे, असा आरोप खरगे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ पेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्याचे सांगण्यात येत आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडावरुन आता भाजपवर आरोप सुरु झाले असून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टिका केली आहे.
खरगे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यामागे भाजपचा हात आहे. कारण भाजपच स्थिर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आमदारांना सूरतवरुन गुवाहाटीला घेऊन गेले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील भाजप सरकार आहे. परंतु महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन याचा मुकाबला करायला तयार आहोत. शिवसेनेचे बंडखोर आमदार परत येतील व समस्येतून मार्ग निघेल, अशी आपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली आहे.
president election bjp strategy maharashtra government politics Maharashtra political crisis