नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाचे १५ वे राष्ट्रपती कोण असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी ही निवडणूक म्हणजे विजयाची औपचारिकता आहे. विरोधी पक्ष या निवडणुकीत एकजूट दाखवू शकतील की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि रालोआमध्ये नसलेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी अद्याप चर्चादेखील सुरू झालेली नाही.
संख्यबळानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआजवळ ४८.९ टक्के मत आहे. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भाजपला बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसदरम्यानची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला तर भाजपकडे जवळपास ५८ टक्के मत असतील. गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनायक यांची नुकतीच भेट घेतली होती.
नुपूर शर्मा प्रकरणामुळे मुस्लिम देशांची भारताविरुद्ध झालेली एकजूट पाहता देशाच्या सर्वोच्च पदासाठी भाजपकडून मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचे नावही समोर येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार रिंगणात उतरविण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने रामनाथ कोविंद यांच्या विरोधात मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी काँग्रेसकडे बहुमत नव्हते आणि आताही काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. मर्यादित संख्याबळ असल्यामुळे काँग्रेस सहकारी पक्षांना सहभागी करून निर्णय घेणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेले खासदार आणि आमदार मतदान करतात. त्यांच्या मतांचे मूल्य वेगवेगळे असते. एका खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. तर आमदारांच्या मताचे मूल्य त्या राज्याची लोकसंख्या आणि जागांच्या संख्येवर अवलंबून आहे. खासदार आणि आमदारांच्या एकूण मतांना इलेक्ट्रोरेल कॉलेज असे म्हटले जाते.