मुंबई – नऊ महिने बाळाला पोटात सांभाळणे आणि त्याला जन्म देणे यातील कष्ट आणि वेदना एखादी आईच जाणू शकते. अगदी गर्भारपणाच्या पहिल्या दिवसापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत नऊ महिने या गर्भवती महिलेची अत्यंत काळजी घेतली जाते. इतकेच नव्हे तर प्रसूतीच्या वेदना होताच किंवा जाणवू लागत असतील तर लगेच तिचे नातेवाईक तिला प्रसुतीगृहात दाखल करतात. यामागे अत्यंत काळजी घेण्याचा उद्देश असतो. परंतु एखादी महिला वाहन चालवत तेही चक्क सायकल चालवत प्रसुतीगृहात दाखल झाली आणि तिने बाळाला जन्म दिला तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. अशी घटना घडली आहे, परंतु ती आपल्या देशात नव्हे तर परदेशात.
न्यूझीलंडच्या खासदार ज्युली अॅन जेंटर या जबरदस्त चर्चेचा विषय राहिल्या आहेत. ज्युलीने तिच्या फेसबुकवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सायकलने हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. ही छायाचित्रे पाहताच अनेक जण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी खासदाराचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
वास्तविक, न्यूझीलंडच्या खासदार ज्युली अॅन जेंटर यांना रात्री दोन वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर तिने सायकल उचलून हॉस्पिटल गाठले. सुमारे तासाभरानंतर तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला. याची माहिती खासदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला दिली. सायकल चालवण्यापासून ते मुलाच्या जन्मापर्यंतचे अनेक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचा नवराही तिच्यासोबत दिसत आहे.
खासदार ज्युली अॅन जेंटर यांनी लिहिले की, ‘आज पहाटे ३ वाजता आमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यात आले. सायकलवर माझ्या प्रसूती वेदनांचा मी कधीच विचार केला नव्हता, पण तसे झाले आहे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाले तेव्हा फारशी अडचण नव्हती पण हॉस्पिटलचे अंतर कापण्यासाठी मला दहा मिनिटे लागली आणि आता आमच्याकडे एक गोंडस निरोगी बाळ त्याच्या वडिलांच्या मांडीवर झोपलेले आहे. त्यांनी रुग्णालयाच्या टीमचे आभार मानले आणि लिहिले की, रुग्णालयात पोहोचल्यानंतर एक उत्कृष्ट टीम मिळाली, ज्यामुळे प्रसूती लवकर होऊ शकली. खासदार ज्युली अॅन जेंटरची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्युलीच्या या पोस्टवर अनेकांच्या जबरदस्त कमेंट्स येत आहेत.