विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) – आपण २१व्या शतकात जगत असलो आणि विज्ञा-तंत्रज्ञानाच्या कितीही गमजा मारल्या तरी वास्तव जे आहे ते आपण स्विकारलेच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटली, कोट्यवधींचे टेंडर निघाले, अब्जावधी रुपये खर्ची पडले तरी अद्यापही दुर्गम आणि ग्रामीण भागात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा प्रत्यय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात आला आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या गर्भवती महिलेला आरोग्य केंद्रात आणायचे होते. अॅम्ब्युलन्सच काय पण साधा रस्ताही धड नाही. त्यामुळे तिच्या पतीसह ग्रामस्थांनी थेट बांबूची झोळी केली. त्यात तिला बसवले. ही बांबूची झोळी आपल्या खांद्यावर घेऊन केवळ १-२ किलोमीटर नाही तर तब्बल १२ किलोमीटर घनदाट जंगलातून रस्ता तुडवित हे सर्वजण बालापम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले. तेव्हा या महिलेला उपचार मिळू शकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला असून याचनिमित्ताने आपण नक्की कोणता, कसा आणि कुणाचा विकास साधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1423070956138860544