मुंबई – सध्याच्या काळात मधुमेह हा अत्यंत गंभीर आजार म्हणून समोर येतो आहे. हा रोग रुग्णाला हळूहळू कमजोर करत जातो, असं डॉक्टर सांगतात. शिवाय यामुळे होणारे साईड इफेक्ट्सही त्रासदायक असतात. यावर अजूनही संशोधन सुरूच असून नवीन संशोधनानुसार गरोदर असताना जर एखाद्या महिलेला मधुमेह असेल तर त्याचे फार वाईट आणि दूरगामी परिणाम बाळावर होतात. तुम्ही औषधे घेत असाल किंवा मग इन्शुलिनचा उपयोग करत असलात तरीही याचा परिणाम बाळावर होऊ शकतो.
मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. त्यातीलच सध्या समोर येणारा प्रकार म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह. हा एक असा प्रकार आहे, ज्याचे निदान गरोदर असतानाच होते. यात साखरेचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळेच आई आणि बाळ या दोघांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. याचे घटक परिणाम पाहूनच मेरिलॅन्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञानी यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
सायन्स ऍडव्हान्स जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, गर्भावस्थेतील मधुमेहामुळे दर वर्षी जवळपास 3 ते 4 लाख अर्भकांमध्ये मेंदूशी संबंधित दोष निर्माण होतात. यामुळे डोके तसेच पाठीचा कणा निर्माण करणाऱ्या पेशींचा विकास होत नाही. याचा परिणाम गर्भपात किंवा मग जन्माला आलेल्या मुलात अपंगत्व निर्माण होण्यावर होतो.
यासंदर्भातील अभ्यास उंदरांवर करण्यात आला. त्यात समोर आलेल्या निष्कर्षानुसार, अर्भकात अशा अनेक पेशी विकसित होतात ज्या न्यूरल ट्यूबची वाढ योग्य रीतीने होऊ देत नाहीत. त्याच्या विकासात अडथळा निर्माण करतात. तर काही वेळेच्या आधीच विकसित होतात. या अभ्यासाचे मुख्य संशोधक प्रा. पिनिक्सिन यांग सांगतात की, मधुमेह कोणताही असला तरी तो शरीरावर वाईट परिणाम करतो, त्यातही गर्भावस्थेतील मधुमेह अधिक धोकादायक आहे.
ज्या महिलांना अशाप्रकारे गर्भावस्थेतील मधुमेहाचे निदान झाले आहे, त्यांना आपल्या बाळाची काळजी वाटणे, हे अगदी साहजिक आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भवती महिलेला काही विशिष्ट प्रकारची थेरपी देऊन बाळाला यापासून सुरक्षित ठेवता येऊ शकते. मात्र यासाठी नेमकी समस्या काय आणि आईची मानसिक, शारीरिक परिस्थिती काय आहे, यावर सारे अवलंबून आहे.
गर्भावस्थेतील मधुमेह झालेल्या महिलांच्या मुलांना हृदय आणि किडनीचे आजार जन्मजात होतात का, यावर आमचे संशोधन सुरू असल्याचे प्रा. डीन रीस सांगतात. तसे जर असेल तर यावर अधिक संशोधन करून वेगळी उपचारपद्धती निर्माण करावी लागेल. अलीकडे या मधुमेहाचे प्रमाण वाढते असल्याने नवजात अर्भकांमध्ये जन्मजात अपंगत्व येऊ नये यासाठी अनेक गोष्टींचा विचार करून अभ्यास करणे गरजेचे आहे.