मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांमध्ये प्री-वेडिंग शूटची क्रेझ वाढली आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या थीमवर आधारित प्री-वेडिंग शूट करण्यात येतात. या प्रकारच्या फोटोशूटला एकीकडे मागणी असतानाच दुसरीकडे समाजातून विरोधदेखील होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्री-वेडिंग शूटवर बंदी आणता येईल का, असा विचार सुरू झाला आहे.
लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेता यावे, त्या क्षणांचे छानसे छायाचित्रण व्हावे, त्या आठवणी कायम स्मरणात रहाव्यात या उद्देषाने सुरू झालेले प्री वेडिंग शूट वेगवेगळ्या थीममुळे टीकेस पात्र ठरू लागले आहे. विशेषत: या प्रकारामुळे पाश्चिमात्यांचे अंधानुकरण भारतीय तरुण-तरुणी करत असल्याची टीका सुरू झाली आहे. प्री-वेडिंग फोटोग्राफी करताना पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे भावी वर-वधू घालतात. त्यासोबत या फोटोशूटचे प्रदर्शन लग्न समारंभात मोठ्या डिजिटल पडद्यावर करत असतात.
प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ आता शहरासहित ग्रामीण भागातही होत आहे. लग्नाच्या निमित्ताने पाश्चिमात्य देशातील अनिष्ट प्रथांचे अंधानुकरण केले जात असल्याचे अनेक समाजातून म्हटले जात आहे. त्यामुळे काही समालांनी प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र, काही समाजांनी घेतलेल्या या निर्णयाला समर्थन तसेच विरोधदेखील होत आहे. याबाबत अधिक सांगताना विधिज्ञ असीम सरोदे म्हणाले,‘प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येणार नाही. अशी बंदी कायद्याला धरून नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपयोग नाही. प्री-वेडिंग फोटोशूट हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.’
नंदूरबारमध्ये गुरव समाजाने घेतला निर्णय
काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथे दोन दिवसीय दाहीगाव गुरव समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण गुरव समाजाला आवाहन करत प्री-वेडिंग शूट करू नये, लग्न, साखरपुडा अत्यंत साध्या पद्धतीने करावा, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत असून इतर समाजदेखील अशा प्रकारच्या फोटोशूटबाबत विचार करून समाजबांधवांना आवाहन करत आहेत.
Pre Wedding Shoot Ban Possibilities