मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षकांनी मुलांना कोणत्याही प्रकारे शिक्षा करू नये असा आदेशच शिक्षण खात्याने काढलेला आहे. तरीही काही शाळांमध्ये शिक्षक लहान मुलांना शिक्षा करतात, ही शिक्षा जर भयानक असेल तर त्यांचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुंबईतील एका शाळेत दोन महिला शिक्षकांनी मुलांना क्रूर शिक्षा केली. ही बाब त्यांना आता चांगलीच महागात पडली आहे. उच्च न्यायालयाने या शिक्षकांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच या गुन्ह्यांच्या शिक्षेमध्ये कोणतीही सूट न देण्याचा आदेश कायम ठेवला आहे.
पूर्वीच्या काळी छडी लागे छम छम विद्या येई घमघम अशी म्हण होती, त्यानुसार सुमारे ५० वर्षांपूर्वी अगदी पहिलीतील मुलापासून ते दहावीतील विद्यार्थ्यांपर्यंत किरकोळ चुकीवरून देखील मुलांना शिक्षक चांगलेच झोडपून काढत असत, परंतु कालानुरूप बाल मानसशास्त्राचा विकास झाल्याने तसेच लहान मुलांच्या मानसिक अभ्यासात संशोधन होऊन त्यानुसार शालेय संस्कार विद्यार्थ्यांवर घडावेत यासाठी शिक्षा करण्यास बंदी आहे परंतु तरी पूर्वप्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षकांनी मारणे, ओरडणे किंवा चिमटे काढणे हे क्रूर असल्याचे नमूद करून शिक्षिकांच्या अशा वर्तनाबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इतकेच नव्हे तर पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अशी वागणूक देणाऱ्या मुंबईतील कांदिवली येथील पूर्वप्राथमिक शाळेतील शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे. या संदर्भात न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने सदर शिक्षिकेची याचिका फेटाळताना म्हटले आहे की, अल्पवयीन मुलांना क्रूर वागणूक दिल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दरम्यान, कांदिवली येथील पूर्वप्राथमिक शाळेत शिकणाऱ्या दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांनी याचिकाकर्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याचिकाकर्तीने अटक टाळण्यासाठी आधी कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
एके दिवशी मुलगा घाबरलेल्या अवस्थेत तक्रारकर्त्यां पालकांना दिसला. त्यांनी शाळेतील इतर मुलांच्या पालकांकडे याबाबत विचारणा केली. त्यांनीही त्यांच्या मुलांमध्ये असाच बदल दिसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेल्या घटनेचे चित्रण तपासले. त्यावेळी मुलांना दोन शिक्षिका मारताना, चिमटे काढताना दिसल्या.तर काही मुलांना उचलून जमिनीवर फेकल्याचे दिसून आले. घाबरलेल्या पालकांनी तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा नोंदवला.आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही याचिकाकर्त्यां शिक्षिकेने केला होता. परंतु , शिक्षिकेच्या युक्तिवादाला पालकांच्या आणि पोलिसांच्या वतीने विरोध करण्यात आला. आरोपी विरोधातील गुन्हे गंभीर आहेत. त्यांच्या क्रूरतेमुळे मुलांच्या वागणुकीत लक्षणीय बदल झाले आहेत, असे म्हटले होते.
Pre Primary Student Punishment Teacher High Court