नवी दिल्ली – दिल्ली शहरालगत असलेल्या गुरुग्रामच्या सेक्टर-४७ मध्ये एक अनोखी घटना घडली आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी दर आठवड्याला उघड्यावर होणाऱ्या नमाजाला असंख्य स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. अखेर नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. काही नागरिकांनी नमाज सुरू असताना त्या समोर भजन आणि कीर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तत्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यांनी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ही समस्या दहा दिवसांत सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत काहीही झाले नाही. त्यामुळे उघड्यावर नमाज अदा करण्यावर बंदी येईपर्यंत त्यांचा निषेध सुरू राहील, असे नागरिकांनी म्हटले आहे.
संघटनेचे प्रमुख सुनील यादव यांनी सांगितले की, उघड्यावर नमाज अदा केल्याने सामाजिक वातावरण खराब होत आहे. नमाज पठण करण्याची जागा असत. त्यामुळे तिथे जाऊन प्रार्थना किंवा नमाज करण्यात काय अडचण आहे. वास्तविक प्रशासकीय अधिकाऱ्यांना हवे असल्यास उघड्यावर नमाज थांबवता येते, पण प्रशासन ते थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांनी हातात पोस्टर्स घेऊन निदर्शने केली. तर यात सहभागी महिलांनी हातात माईक घेऊन देवीचे गाणे गाऊन भजन कीर्तनही केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कार्यवाही सुरू केली असून दोन्ही बाजूंशी मध्यस्थी करीत आहेत.