नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव २०२१ साजरा करण्याच्या दृष्टीने मिशन विघ्नहर्ता या उपक्रमा अंतर्गत नाशिक महानगरपालिका व नाशिक जिल्हा शाडू मातीचे मुर्तीकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कलादालन येथे १ ते १० सप्टेंबर २०२१ पावेतो पर्यावरण पूर्वक शाडू मातीच्या गणेश मूर्तीं तसेच सजावट, आरास साहित्य यांचे प्रदर्शन व विक्री करिता स्टॉलचे व वेबसाईटचे अनावरण पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते व मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम हाती घेतले जात असतात. मात्र नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेले विविध उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतात मिशन विघ्नहर्ता उपक्रमा अंतर्गत पर्यावरण पूरक शाडू मूर्ती यांचे प्रदर्शन आयोजित करून भाविकांना शाडूच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन करणे नव्याने सुरू करण्यात येणारी टॅंक ऑन व्हील ही संकल्पना प्रदूषण कमी करण्यास मोठा हातभार लावणार आहे. नाविन्यपूर्ण असणारा हा उपक्रम पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार असून या सारख्या विविध उपक्रमां मुळे नाशिक महापालिकेचा राज्यात नावलौकिक वाढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात बोलताना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले की करोनाच्या काळात सर्व सण व उत्सव साजरे करताना आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे त्याचबरोबर पर्यावरणाचं संवर्धन ही महत्त्वाचे असून या उद्देशाने मनपाच्या वतीने विविध संकल्पना राबविल्या जात असतात या संकल्पनेच्या माध्यमातून मिशन विघ्नहर्ता ही संकल्पना गेल्या वर्षीपासून मनपा राबवीत आहे पर्यावरण प्रेमी, शाडू मूर्ती मूर्तिकार यांचा देखील सहभाग यामध्ये आहे मनपाच्या वतीने प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने व कोव्हीड १९ च्या अनुषंगाने रस्त्यावर होणारी गर्दी कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन बुकिंग द्वारे टाईम स्लॉट उपलब्ध करून देऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कोव्हीड १९ च्या अनुषंगाने मोठ्या इमारती कॉलनी या परिसरात टॅंक ऑन व्हील या नवीन संकल्पनेच्या माध्यमातून नागरिकांना श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा साठी मदत होणार आहे. त्यातून पर्यावरणाचे ऱ्हास टाळता येऊ शकेल या मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन मा. आयुक्त कैलास जाधव यांनी केले. गतवर्षी शहरवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी नाशिककर चांगला प्रतिसाद देतील त्यातून एक चांगला आदर्श राज्यात घडेल असा विश्वास आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड यांनी उपक्रमाचे प्रास्ताविक केले उपस्थितांचे आभार नाशिक जिल्हा शाडू मूर्ती संघटनेचे अध्यक्ष संतोष शहरकर यांनी मानले या कार्यक्रमास मा.अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर,उपायुक्त मनोज घोडे पाटील,प्रदिप चौधरी,शहर अभियंता नितीन वंजारी,कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे,विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, आदी उपस्थित होते यावेळी या उपक्रमात सहकार्य करणारे व मोलाचे योगदान असणाऱ्या गौरव बोरसे शौर्या शेटे, संयुक्ता कांबळे,ओमकार कासार आदी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला.