विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, एकाच दिवसात 86 लाखांहून अधिक लोकांना लसीची मात्रा देत भारताने अभूतपूर्व कामगिरी केली. आकाशवाणीवरील आपल्या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाल्यानंतर 21 जून रोजी देशाने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. पंतप्रधान म्हणाले की, हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे कारण एकाच दिवसात सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणात विनामूल्य लसीकरण करण्यात आले होते.
प्रत्येक नागरिकाला लसीद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षिततेचा लाभ घेता यावा हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, यावर श्री. मोदी यांनी भर दिला. कोविडवर विजय मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल असे सांगत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्तीने मग ते बँक कर्मचारी, शिक्षक, छोटे व्यापारी किंवा दुकानदार, फेरीवाले,सुरक्षा कर्मचारी किंवा टपालवाहक असोत या सगळ्यांनी महामारीच्या विरोधात लढा दिला आहे.
पंतप्रधानांनी भारत सरकारचे सचिव असलेले गुरुप्रसाद महापात्रा यांचे स्मरण केले. श्री. मोदी म्हणाले की, देशातील ऑक्सिजन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी आणि दुर्गम भागात ऑक्सिजन पोहोचवणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. कोरोनामुळे हा कर्मयोगी देशाने गमावला याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.









