सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलिस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईनंतर या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
प्रतापगड परिसरातील अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. चार जिल्ह्यातील १५००हून अधिक पोलिस कर्मचारी प्रतापगडावर दाखल झाले होते. ही कारवाई म्हणजे शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. शिवप्रतापदिनी अवतीभोवती अनेक हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुक्यामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी याबाबत कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.
या परिसरात १४४ कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली.
चोख बंदोबस्तात कारवाई
प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानची कबर आहे. मात्र मागील काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.
धार्मिक स्थळांभोवती बंदोबस्त
या मोहिमेनंतर जिल्ह्यात अनुचित प्रकार घड नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच प्रार्थना स्थळ पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतापगड परिसरात जमावबंदी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील मंदिरे, मस्जिद परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
Pratapgad Afzal Khan Tomb Encroachment
Satara