मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काँग्रेसला आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझ्यापेक्षा नेतृत्व आणि सामुहिक इच्छाशक्तीची गरज आहे, निवडणुकांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा हा टोला काँग्रेसला वस्तुस्थिती कळण्यासाठी पुरेसा आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव फेटाळत त्यांनी हा सल्लाही दिला आहे. प्रशांत किशोर आणि काँग्रेसमध्ये नेमके असे काय घडले, ज्यामुळे ही चर्चा वर्षभरात दुसऱ्यांदा फिस्कटली?
चर्चा फिस्कटण्यामागे दोन्ही बाजूला विश्वासाचा अभाव असल्याचे मानले जात आहे. प्रशांत किशोर यांनी दुसऱ्या पक्षांशी असलेले संबंध तोडावे आणि फक्त काँग्रेससाठी काम करावे, असे काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करताना स्पष्ट केले होते. काँग्रेसला विश्वासात न घेता प्रशांत किशोर टीआरएससोबत चर्चा करण्यासाठी हैदराबादला गेले. तिथे त्यांच्या कंपनीने निवडणूक प्रचाराचा करारही केला, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
प्रशांत किशोर यांच्याशी भेट झाल्यानंतर टीआरएस नेते के टी रामाराव म्हणाले, की राहुल गांधी यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला बळ मिळत आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे किशोर यांच्याविरुद्ध काँग्रेसमध्ये वातावरण निर्माण झाले. प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास राहुल गांधी यांच्या विश्वासू आणि निकटवर्तींयांचा विरोध आहे असे मानले जात आहे.
https://twitter.com/PrashantKishor/status/1518901590056333313?s=20&t=pPiZW2ENIeLSHaT8ozGRKA
प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून गांधी कुटुंबीयांमध्येसुद्धा एकमत नव्हते, असा दावा काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी यांना प्रशांत किशोर सोयीस्कर नव्हते. त्यामुळेच राहुल गांधी फक्त एका बैठकीत हजर राहिले, तर प्रियंका गांधी वाड्रा जवळपास प्रत्येक बैठकीत उपस्थित होत्या. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या नेतृत्वाबद्दल दिलेल्या सल्ल्याबाबत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील सहमत नव्हत्या. त्यामुळेच प्रशांत किशोर पक्षात प्रवेश करू शकले नाही.
प्रशांत किशोर यांचे इतर पक्षांशी असलेले संबंध आणि त्या पक्षांकडून सतत राहुल गांधी यांना टार्गेट करणे हेसुद्धा एक कारण मानले जात आहे. प्रशांत यांच्या कार्ययोजनेवर सल्ला देण्यासाठी गठित समितीने आपल्या अहवालातही किशोर यांच्याविरुद्ध प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध करण्यात आलेले ट्विट आणि असे अनेक सल्ले ज्यामुळे दुसऱ्या पक्षांना फायदा मिळू शकला असता, या विषयी अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.