विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या रणनीतीपासून ते प्रचारापर्यंत महत्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर आता यापुढे निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. एका टि.व्ही. चॅनेलशी बोलताना प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत मी पुरेसे काम केले असून आता माझ्यावर विश्रांती घेण्याची आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मला यापुढे निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी काम करायचे नाही.
तृणमूल कॉंग्रेसचे रणनीतिकारक प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीत निवडणुकीचे काम सोडण्याचे जाहीर केले आहे. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, मला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असल्यामुळे निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी काम करायचे नाही.
पुन्हा राजकारणात प्रवेश करणार का? असे विचारले असता प्रशांत किशोर म्हणाले की मी एक अयशस्वी राजकारणी आहे. जर मी राजकारणात गेलो तर मला परत यावे लागेल प्रशांत किशोर यांचा हा निर्णयही सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे, कारण त्यांनी बंगाल निवडणुकीबाबत आतापर्यंत केलेली भविष्यवाणी खरी असल्याचे दिसते. भाजप शंभर जागांवरुन खाली असल्याचे दिसते आणि अशा परिस्थितीत त्यांनी ही घोषणा करून सर्वांनाच चकित केले.
वास्तविक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या जागा १०० पार केल्यास आपली नोकरी सोडणार असल्याचे जाहीरपणे अनेकवेळा जाहीर केले आहे. जेव्हा त्यांनी ट्विटरवर पहिल्यांदा ही घोषणा केली तेव्हा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी असा दावा केला की, ते ट्विटर सोडण्याबद्दल बोलत आहेत.
परंतु अलीकडेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचे सल्लागार बनलेले प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण निवडणूक रणनीतिज्ञांचा व्यवसाय सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, जर भाजपला १०० जागा मिळाल्या तर त्यांचे काम सोडणार होते. या उलट आता बंगाल निवडणुकीत भाजप १०० जागांपेक्षा खूप कमी आहे, तरीदेखील ते आता हे काम यापुढे करणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.