इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात सध्या प्रेमाच्या ऋतुला बहर आलेला दिसतोय. अनेक जोड्या आपले प्रेम जाहीर करत आहेत. काही तर साखरपुड्यापर्यंत पोहोचले आहेत. गायिका – अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने साखरपुड्याची बातमी दिल्या पाठोपाठ आता अभिनेत्री अमृता देशमुख – प्रसाद जवादे यांनी आपला साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून त्याची तारीखही त्यांनी जाहीर केली आहे.
बिग बॉसमध्ये झाली ओळख
प्रसाद – अमृताची ओळख बिग बॉसमध्ये झाली. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची भांडण – मिश्किल मैत्री बिग बॉस मराठी ४ च्या घरात प्रेक्षकांनी पाहिली. प्रसाद आणि अमृता यांची मैत्री वाढली ती बिग बॉस नंतर. बिग बॉसनंतर ते एकमेकांसोबत भटकंती करताना, इव्हेंटमध्ये एकत्र जाताना दिसले. तेव्हाच चाहत्यांना थोडी कुणकुण लागली. खरं तर चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. बिग बॉस मधील त्यांची रोमँटिक केमस्ट्री आता खऱ्या आयुष्यातही उतरली आहे. प्रसाद-अमृताने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली. प्रसाद आणि अमृता यांचा साखरपुडा झाला असून त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही सांगितले.
काय आहे इन्स्टाग्राम पोस्ट?
अमृताने प्रसादसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. या फोटोत दोघेही त्यांची अंगठी फ्लाँट करतांना दिसत आहेत. अमृता म्हणते की, ‘आमचा साखरपुडा झाला. आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.’ अशी खास बिग बॉस टच असलेली कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या त्यांच्या रोमँटिक फोटोमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख सांगितली असून हे कपल १८ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकेल. प्रसादनेही ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सेलिब्रिटींनी केले अभिनंदन
तेजश्री प्रधान, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, समृद्धी केळकर, प्रार्थना बेहेरे या कलाकारांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
			








