मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर ३६०० कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या की, पुतळा दुर्घटना म्हणजे सरकारचे मोठे स्कॅम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.
हा आरोप करतांना खासदार शिंदे म्हणाल्या की, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला. या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी स्वतः उद्घाटन केलं आणि त्याची अवस्था ही झाली आहे. वरून फक्त शो आणि आतमधून पोकळ असणारे हे सरकार आहे. लोकांची दिशाभूल करत आहेत.
दरम्यान, राज्यभर काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महायुती सरकार विरोधात नारेबाजी करत निषेध आंदोलन केले. या सर्व आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.