आठवणीतले प्रदीप भिडे सर…
– प्रमोद कोलप्ते, नवी दिल्ली
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या
आपल्या बुलंद अशा खर्ड्या आवाजात बातम्या देणारे आणि बातमी कशी वाचावी,बातमीतील आत्मा श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवावा यांचे कसब पुर्णतः आत्मसात केलेले दूरदर्शनचे ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ही बातमी ऐकून धक्का बसला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या सोबत काम केल्याच्या अनेक आठवणी मनात दाटून आल्या.
एरवी त्या काळात बातमी सारख्या रुक्ष प्रकाराला केवळ आपल्या आवाजाच्या धारेमुळे जनमानसात लोकप्रिय करणाऱ्या प्रदीप भिडे नामक अवलियाने लोकांना अक्षरशः भुरळ घातली होती.
मिनिटांवर चालणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या किंबहुना देशभरातल्या मराठी श्रोत्यांना/प्रेक्षकांना सायंकाळी ७ वाजता दूरदर्शन च्या सह्याद्री या वाहिनीवर नमस्कार,आजच्या ठळक बातम्या हे बिरूद केव्हा कानावर पडते असे व्हायचे. अमुक एक वाजताची सायंकाळची लोकल पकडुन, गाव खेड्यात एसटी पकडून लोक केवळ अन् केवळ भिडे सरांच्या बातम्या ऐकण्यासाठी टिव्ही समोर बसण्याचा अट्टाहास करताना मी पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या आवाजातील जादूने मोहून जाणारा मोठा वर्ग हा सह्याद्री वहिनीच्या प्रेमात पडायचा.
बातम्यांच्या वाहिन्यांचा जमाना आज इतका फुगलेला आणि फोफावलेला नसतानाही सह्याद्री या वाहिनीवर भिडे सरांनी दिलेल्या बातम्या अत्यंत लोकप्रिय होत्या असे म्हंटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. नंतरच्या अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या काळात बातम्यांच्या अनेक वाहिन्या आल्या. सुरुवातीला दिवसभरातून दोन चार बातमीपत्र देणाऱ्या वाहिन्या या दिवस रात्र २४ तास बातम्या देऊ लागल्या. अशा या स्पर्धेच्या युगात देखील सकाळी ७ दुपारी २.३० सायंकाळी ७ यात १५ मिनिटे व रात्रौ ९.३० वाजता अर्ध्या तास अशी चार बातमीपत्र देणारी सह्याद्री वहिनी ही टीआरपी मध्ये अनेक वर्ष केवळ स्पर्धेत राहिली नाही तर भिडे सरांनी दिलेल्या सायंकाळी ७ वाजताच्या बातम्यांनी अनेकदा टीआरपी चे सारे रेकॉर्ड तोडलेले आम्ही पाहिलेले आहेत.
अर्थात अनेक वृत्त निवेदक यांचा वाटा त्यात असला तरी भिडे सर ग्रेटच होते. जास्त स्टोरीज किंवा visuals नसताना फक्त Dry स्वरूपाच्या कोरड्या बातम्या देत दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीची लोकप्रियता टिकवून ठेवली त्याचे खरं क्रेडिट भिडे सरांना जाते. बातमी कशी वाचावी,बातमीचा आवश्यक परिणाम श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आवाजातील चढ उतार बातमीतील अर्धविराम, पूर्णविराम,स्वल्पविराम यांची काळजी घेत बातमीदाराने लिहिलेल्या बातमीतील अचूक भाव श्रोत्यांपर्यंत गेला पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे
सुदैवाने मला त्यांच्या सोबत सह्याद्री वाहिनीवर दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली. अनेकदा बातमी कोणी लिहिली आहे म्हणून ते विचारणा करीत असत. अमुक एक बातमी मी अशी वाचली तर चालेल का किंवा तुला कशी वाचावी असे अपेक्षित आहे असे कोणताही अभिनिवेश बाळगता ते आम्हाला विचारत असत तेव्हा त्यांच्यातील महानता दिसून येत असे. अनेकदा पीटीआय यु एन आय घ्या बातम्यांचे उत्तम भाषांतर केलं आहे वा खूप छान अशी आशयघन बातमी लिहिली आहे अशी कौतुकाची थाप देखील त्यांनी पाठीवर दिलेली आहे.
त्यामुळे वृताच्या दुनियेतील मोठा निवेदक आणि तितकाच आपुलकी व साधेपणा जपणारा,हवाहवासा वाटणारा माणूस हरपला, काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख फार मोठे आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी बुलंद आवाजा भतील त्यांचे नमस्कार,आजच्या ठळक बातम्या हे बिरूद कायम स्मरणात राहील. मी स्वर्गीय प्रदीप भिडे सरांना विनम्र आदरांजली वाहतो.