नाशिक – येथील ‘परिवर्त परिवार’ या संस्थेतर्फे ‘कोरोना : सर्पकाळातील काही कविता’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध विद्रोही कवी धुरंधर मिठबांवकर यांच्या हस्ते संपन्न झाले. समारभाच्या अध्यक्षस्थानी कवी अमोल बागूल होते. प्रमुख पाहुणे असलेले डॉ. त्र्यंबक दुनबळे, कवी देवीदास चौधरी विभागिय आदिवासी विकासचे उपायुक्त प्रदीप पोळ संग्रहाचे संपादन करणारे प्रा. गंगाधर अहिरे व संस्थेचे प्राचार्य दिनकर पवार व अशोक मोरे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी कवी मिठबांवकर म्हणाले की, विपरीत परिस्थितीतीला जाब विचारत पहिले बंड संतकवींनी पुकारले आणि हा वारसा यापुढील काळात कवी चालू ठेवतील. कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीत सामान्यांचा रोजगार गेला. लोक घरात बंदिस्त झाले. अठराव्या शतकातील अस्पृश्यता नवे रूप घेऊन पुन्हा जन्माला आली. यावर प्रहार करणारी कविता या काव्यसंग्रहात आहे. तर डॉ. दुनबळे म्हणाले, सहजगत्या व्यक्त झालेल्या आशयघन कविता हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. यातील कविता प्रासंगिक असल्या तरी दीर्घकाळ मनात टिकून राहतील. कोरोनाने उद्भवलेल्या समाजवास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या कविता आहेत. कवी, देवीदास चौधरी यांनी यावेळी कवितांचे वाचन केले. प्रा. गंगाधर अहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विविध कविंच्या जाणिवेतील कोरोना वेदनावळीचे दस्तावेजीकरण व्हावं या भूमिकेतून प्रस्तुत संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. सदर संग्रहात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कविंच्या कविता संग्रहीत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाविषयीचे वास्तविक अनुभव काव्यात्मक शब्दोळीतून प्रकट झालेले आहेत. या समारंभात संस्थेने आयोजित केलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिके मा. प्रदीप पोळ यांचेहस्ते
गीतलेखन, काव्यलेखन, गीत गायन आणि रांगोळी स्पर्धांच्या विजेत्यांना प्रदान करण्यात आली. संग्रहात कविता समाविष्ट असलेल्या कवी प्रदीप जाधव, प्रशांत केंदळे, राजेंद्र उगले, राजेंद्र सोमवंशी आणि मुखपृष्ठकार बुद्धभुषण साळवे यांचा संग्रह देऊन सत्कार करण्यात आला. समारंभात नितीन भुजबळ, आशोक बनसोडे, जयंत बोढारे, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. चंद्रकांत गायकवाड, श्यामराव बागूल, रविंद्र मालूंजकर, संतोष जोपुळकर, कवी अरुण घोडेराव, डॉ. संजय जाधव ॲड. विजय निर्भवणे, बाळासाहेब शिंदे, प्रतिभा अहिरे, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिंदे, रोहीत गांगुर्डे यांनी केले. कवी काशिनाथ वेलदोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.