नाशिक – येथील ‘परिवर्त परिवार’ या संस्थेच्या माध्यमातून ‘कोरोना : सर्पकाळातील काही कविता’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन १ ऑगस्टला सकाळी ११ वाजता गडकरी चौकातील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. प्रस्तुत संग्रहाचे संपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील ४६ कविंच्या कविता संग्रहात समाविष्ट आहेत. आशोक नायगावकर, रामदास फुटाणे, आशोक थोरात, प्रज्ञा दया पवार, अविनाश गायकवाड, योगीनी राऊळ, अशोक पळवेकर, संतोष पवार यांसह नाशिकच्या संजय चौधरी, आशोक बनसोडे, काशिनाथ वेलदोडे, विवेक उगलमुगले, संतोष वाटपाडे, जयश्री वाघ आदी प्रतिथयश कविंच्या कवितांचाही संग्रहात समावेश आहे. प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष कवी अमोल बागूल आहेत. डॉ. त्र्यंबक दुनबळे, कवी देवीदास चौधरी संग्रहाबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गीतलेखन, काव्यलेखन, गीत गायन आणि रांगोळी स्पर्धांच्या विजेत्यांना प्राचार्य डॉ. निलकंठ जोगदंड, आदिवासी विकासचे उपायुक्त प्रदीप पोळ आणि नाशिक विभागाचे लेखापरीक्षक मा. सुहास पवार यांचे हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रकाशन व पारितोषिक वितरण सोहळ्यात कोरोनाविषय नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सदर समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य दिनकर पवार, अशोक मोरे, रोहीत गांगुर्डे, चंद्रकांत गायकवाड, प्रदिप जाधव, नितीन भुजबळ आणि किशोर शिंदे, यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.