इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधुचा विजयी मेळावा हा ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.
दरम्यान या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भावूक वक्तव्य केले आहे. राज-उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले की मी मरायला मोकळा आहे. स्वर्गात जाऊन बाळासाहेबांना दोघे एकत्र आल्याचे सांगेन असे उदगार त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीपाशी काढले. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येतानाचा हा क्षण पाहायला बाळासाहेब ठाकरे हवे होते. हीच गोष्ट सांगण्यासाठी मी आज बाळासाहेबांच्या समाधीपाशी आलो होतो. मी त्यांना प्रत्यक्षात ही गोष्ट सांगू शकत नाही.
पण, उद्याच्या सोहळ्यानंतर मला मरण आले तर मी वर जाऊन बाळासाहेबांना सांगेन की राज – उध्दव एकत्र येण्याचा सोहळा मी पाहिलाय. दोन भाऊ मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, शेतक-यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत. मी हा आनंदसोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. बाळासाहेब तुम्ही आता महाराष्ट्राची चिंता करु नका, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. यावेळी त्यांनी दोन सिंह एकत्र येऊ नये म्हणून कोल्हेकुई सुरु असल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली.