येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुसती याची गर्जना, त्याची गर्जना.. इकडे मज्जिद काढा, तिकडे मंदिर बांधा, येथील भोंगे उतरवा हा काही देशाचा प्रश्न नसल्याचे म्हणत प्रहार संघटनेचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाव न घेता त्यांच्यावर प्रहार केला आहे. तसेच, शेतकऱ्यांचे व इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगाव येथे सभा होत आहे, असे पत्रकारांनी आमदार बच्चू कडू यांना विचारले. त्याववर कडू म्हणाले की, सभा घेतली की लगेच जनतेचे मन आणि मत परिवर्तन होत नाही. बाळासाहेबांच्याही सभेला मोठी गर्दी व्हायची. प्रत्यक्षात शिवसेनेची सत्ता केव्हा आली हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे सभा घेतली की जनता लगेच दुसरा आमदार निवडून देतील, असे नाही. नुसती याची गर्जना त्याची गर्जना, इकडे मज्जिद काढा, तिकडे मंदिर बांधा, येथील भोंगे उतरवा, हा काही देशाचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न आहे, याकडे लक्ष द्यावे. जनतेत जाऊन काम केले तर जनता संधी देते, असे कडू म्हणाले. याद्वारे कडू यांनी राज आणि उद्धव यांच्यावर जोरदार टीका केली.
तालुक्यातील पाटोद येथील विशाखा लॉन्स येथे प्रहार संघटनेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जीवनमरणाचा बनलेला कांदा बाजार भावाचा प्रश्न, पालखेडच्या पाण्याची समस्या, रखडवलेला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव मांजरपाडा प्रकल्प, रखडलेले सिंचन प्रकल्प, रोजगाराअभावी सैरभैर झालेली तरुण पिढी, ग्रामीण रस्त्यांची झालेली दुरावस्था, तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने दुर्लक्षित प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
Bacchu Kadu | इकडे मस्जिद काढा, तिकडे मंदिर बांधा, भोंगे उतरवा, हा देशाचा प्रश्न नाही, बच्चू कडू
#bacchukadu #masjid #rajthackeray #uddhavthackeray pic.twitter.com/P6W1RVv4Ba— News State Maharashtra Goa (@NSMaharashtra) March 26, 2023
Prahar MLA Bacchu Kadu on Raj and Uddhav Thackeray in Yeola