अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी गटांमधील दोन आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप केल्याने हा वादळ उफाळला. त्यानंतर दोघांमध्ये मध्यस्थी करत समेट घडवून आणण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना वर्षा बंगल्यावर बोलविले होते. परंतु त्यांना एकाच वेळी न बोलता वेगवेगळ्या वेळी बोलवण्यात आले. यावेळी आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांची माफी मागितल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आज दि. १ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये आपल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बॅनरवर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना म्हटले आहे की, रवी राणा यांची ही पहिलीच वेळ असल्याने माफ करतो. परंतु यापुढे मात्र असे घडले तर कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही, असा जणू काही त्यांनी इशारा दिला आहे.
बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका जाहीर केली. त्यापुर्वी, या सभेच्या ठिकाणी मैं झुकेगा नही’ असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसचे रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडू यांना वाद संपला का, अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देखील बच्चू कडू यांनी, नाही, अजून वाद संपला नाही. आमच्या पक्ष सदस्यांशी मी चर्चा करणार आहे. आम्ही सर्व मुद्दे लिहून घेतले आहेत. संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून ते जिल्हा प्रमुखांसमोर मांडणार आहोत. त्यानंतर पुढे काय करायचे? हा निर्णय घेतला जाईल’, असे म्हटले होते.
बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजी करुन शिंदे गटासोबत गेल्याचा आरोप करणे चूक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणामुळे आता भविष्यात रवी राणा किंवा अन्य कोणताही नेता ठरवले तरी बच्चू कडू यांच्यावर सौदेबाजीचा आरोप करु शकणार नाही. एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांनी रवी राणा यांना बच्चू कडू यांची माफी मागायला लावली तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांची भक्कमपणे साथ दिली आहे. वास्तविक पाहता आमदार रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, परंतु फडणवीस यांनी रवी राणा यांना पाठीशी घातले नाही, कारण रवी राणा यांनी उघडपणे आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा फडणवीस यांनी स्पष्टपणे इन्कार केला. त्यामुळे रवी राणा हे तोंडावर पडल्याचे म्हटले जात आहे, या उलट बच्चू कडू यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
आपली पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला. त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडूंनी आपली भूमिका केली स्पष्ट, म्हणाले. रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतो. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावले मागे घेतली तर आम्ही चार पावले मागे घेऊ. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू, असे बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी यावेळी प्रहार संघटनेनं आजवर गोरगरीब जनता, अपंग व्यक्ती, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसंच बंडखोरीच्या मुद्द्यावरही भाष्य केले, आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत ते मला सांगा. खरेतर बंडखोरच आज पहिल्या पंक्तीत आहेत. आज पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय. पण प्रहारच्या वाटेत यापुढे कुणी येईल तर प्रहारचा वार कसा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही गांधींना मानतो पण भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे. यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. भविष्यात प्रहारचे १० आमदार स्टेजवर असतील, तसेच प्रहार संघटना पुढील काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असेही बच्चू कडू म्हणाले.
Prahar Chief Bacchu Kadu Announcement