नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या ७७ वर्षांपासून कार्य करणाऱ्या रोटरी कल्ब ऑफ नाशिकचे कार्य कौतुकास्पद आहे. ही संस्था राबवित असल्यालेले उपक्रम पाहून मनस्वी आनंद वाटतो. रोटरीच्या उपक्रमांसाठी पुढील काळात सीएसआरच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने महत्वपूर्ण आर्थिक योगदान दिले जाईल असा विश्वास स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक सीए प्रफुल छाजेड यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक प्रफुल छाजेड आणि प्रांतपाल मोहन पालेशा, सह प्रांतपाल डॉ. अरुण स्वादी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. छाजेड बोलत होते.
प्रांतपाल मोहन पालेशा म्हणाले की, सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नाशिक रोटरीचे काम वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ह्या क्लबमध्ये सामावून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसतेय. सीएसआरच्या माध्यमातून तळागाळातील गरजूंना मदतीचा हातभार लावण्यासाठी योगदान देणाऱ्या कंपन्यांचे मोठे सहकार्य दिलेय ही अभिमानाची बाब आहे. पुढील काळात ते अधिक वृद्धिंगत होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या क्षमतेपेक्षा समाजातील गरजूंना किती मदत करतो याचा विचार करायला हवा. जीवनात माणसाच्या गरजा कमी आणि अपेक्षा जास्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. ती बदलणे गरजेचे असून, स्वातंत्र्यानंतर आजही सामाजिक सुरक्षितता वाढत गेली. लोकांच्या सामाजिक संवेदना बोथट होत चालली असल्याचे ते म्हणाले.
पिंक रिक्षाच्या माध्यमातून महिलांना करणार स्वावलंबी – अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, दरवर्षी रोटरी क्लब ऑफ नाशिक समाजातील निरनिराळ्या घटकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवते. हीच परंपरा पुढे नेत आगामी वर्षात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रोटरी चौक, कोरोना काळात विधवा झालेल्या गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी पिंक रिक्षा प्रकल्प राबविणे, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यावर भर दिला जाईल. तसेच समाजातील विविध घटकांचा सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक विकास आणि त्यांचे आरोग्य यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले. दरम्यान पिंक रिक्षा उपक्रमासाठी कोरोना काळात विधवा झालेल्या गरजू महिलांनी संस्थेच्या गंजमाळ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले.
सीएसआरद्वारे राबविले ३ कोटी २४ लाखांचे प्रकल्प
रोटरी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सीएसआर हा अतिशय महत्वाचा भाग असतो. सीएसआरच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी निरनिराळ्या उपक्रमांसाठी खर्च करण्यात आला. यासाठी रोठे इर्डे इंडिया, इंडियन व्हॅल्यू, रिंग प्लस अॅक्वा, एमएसएल ड्राइव लाईन सिस्टीम, गोल्ड सील इंजिनिअरींग या कंपन्यांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष शशिकांत पारख, सचिव ओमप्रकाश रावत, सहसचिव डॉ. गौरव सामनेरकर, खजिनदार संदीप खंडेलवाल, कार्यक्रम समिती प्रमुख शिल्पा पारख, लिटरसी संचालक उर्मी दिनानी, माजी अध्यक्ष डॉ. श्रिया कुलकर्णी, क्लब अॅडमिन ऋषिकेश सन्नमवार, क्लब ट्रेनर अजय नारकेसरी, स्कीन बँक संचालक डॉ. राजेंद्र नेहेते, सीएसआर कमलाकर टाक, मेंबरशिप राज तलरेजा, टीआरएफ सुधीर जोशी, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, इंटरॅक्ट कीर्ती टाक, कम्युनिटी सर्व्हिसेस हेमराज राजपूत, प्रणव गाडगीळ, रोटरॅक्ट निलेश सोनजे, विन्स नितीन ब्रम्हा, दत्तकग्राम डॉ. रामनाथ जगताप, रोटरीनामा विनायक देवधर, आदरातिथ्य तेजपाल बोरा तसेच सार्जंट आर्मस सतीश मंडोरा, दमयंती बरडिया, सुरेखा राजपूत, आणि सागर भदाणे यांनी पदग्रहण केले. संचालक मंडळावर सल्लागार म्हणून मुग्धा लेले, रवी महादेवकर आणि विजय दिनानी हे काम पाहणार आहेत.
मावळते अध्यक्ष डॉ. श्रिया कुलकर्णी आणि सचिव मंगेश अपशंकर यांनी गतवर्षात केलेल्या उपक्रमांच्या सामाजिक कार्याचा अहवाल ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून मांडला. याप्रसंगी अध्यक्ष प्रफुल बरडिया यांनी मायक्रो क्रेडीटसाठी २१ हजारांचा धनादेश खजिनदार संदीप खंडेलवाल यांच्याकडे सुपूर्त केला. कार्यक्रमास आयकर विभागाचे आयुक्त सतीश गोयल, जीएसटी विभागाचे उपायुक्त सुमेर काले, स्टेट बँकेचे विक्रम नेगी, माजी प्रांतपाल रमेश मेहेर, दादा देशमुख, अशोका ग्रुपचे संचालक परेश मेहता, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता अपशंकर आणि सागर भदाणे यांनी केले. सचिव ओमप्रकाश रावत यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथ लीडर वृषाली ब्राह्मणकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Praful Bardiya is now Nashik Rotary club President