पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बचत योजना बंद होऊ नये यासाठी, अनेक लहान बचत योजनांप्रमाणे सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) या योजनांनाही दरवर्षी किमान योगदानाची आवश्यकता असते. जर या योजनांच्या खातेधारकांनी चालू आर्थिक वर्षासाठी पैसे जमा केले नाही, तर अशा खातेधारकांना खाते सुरू ठेवण्यासाठी ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वीच पैसे जमा करावे लागणार आहेत. या सर्व योजना करदात्यांना प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कपातीचा फायदा घेण्यास मदत करतात. कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या कपात मर्यादेत ८०सीसीसी (निवृत्तीवेतन योजनेत योगदान) आणि ८० सीसीडी (१), ८०सीसीडी (१बी) आणि ८० सीसीडी (२) यांचा समावेश आहे.
सार्वजनिक भविष्य निधी
एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये वार्षिक योगदान द्यावे लागते. चालू आर्थिक वर्षात ३१ मार्च ही रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे. जर कोणी या मुदतीत आपले योगदान जमा करू शकले नाही, तर त्याला गेल्या वर्षासाठी ५० रुपये दंड आणि त्या वर्षासाठीचा ५०० रुपयांची थकबाकी भरावी लागणार आहे. त्याशिवाय या आर्थिक वर्षात किमान योगदान भरेल गेले नाही, तर पीपीएफ खाते निष्क्रिय मानले जाणार आहे. खाते पुन्हा अॅक्टिव्ह केल्याशिवाय खातेधारक कर्ज मिळण्यास किंवा अंशतः पैसे काढून घेण्यास असमर्थ ठरेल.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली
एनपीएस खातेधारकांना अकाउंट क्रियाशील ठेवण्यासाठी एका आर्थिक वर्षात किमान एक हजार रुपयांचे योगदान देणे अनिवार्य आहे. जर एनपीएस टियर-१ खात्यात योगदान दिले गेले नाही, तर खाते निष्क्रिय होणार आहे. निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी किमान योगदानासह दरवर्षी १०० रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. एनपीएस खाते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पॉइंड ऑफ प्रेझेंस (पीओपी) शुल्कही द्यावे लागणार आहे. जर कोणाचे टियर -२ खातेसुद्धा असेल, तर टियर-१ खात्यासह टियर -२ खातेही आपोआप गोठवले जाईल. टियर-२ खात्यात किमान योगदानाची आवश्यकता नसताना हे होईल.
सुकन्या समृद्धी खाते
सुकन्या समृद्धी खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला एका आर्थिक वर्षासाठी किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहेत. जर एखाद्या वर्षी तुम्ही ते जमा करू शकले नाही, तर खाते निष्क्रिय मानले जाईल. एसएसवाय खाते उघडण्याच्या १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी निष्क्रिय खाते नियमित केले जाऊ शकते. खाते नियमित करण्यासाठी खातेधारकाला दरवर्षी ५० रुपये दंडासह किमान २५० रुपये जमा करावे लागणार आहेत.