विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात उद्योगांना घरघर लागली. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. तर अनेकांना नोकरी गमवावी लागली. अश्यात आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ प्रत्येकच घटकावर आली. दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अवघड होऊन बसले. अश्यात पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) खात्यातून कर्ज घेणे एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
आर्थिक संकट घालविण्यासाठी अनेकांनी पर्सनल लोन, गोल्ड लोनचा पर्याय निवडला. अनेक वर्षांपासून मेहनतीने बचत केलेले फिक्स डिपॉझीट मोडले. क्रेडिट कार्डवर कर्ज घेणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. पण दुर्दैवाने या सर्व पर्यायांसाठी अव्वाच्या सव्वा व्याज दर मोजावा लागतो. हा उपायच महागडा आहे. पण पीपीएफ खात्यातून कर्ज घेतले तर कुठलीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही आणि क्रेडिट स्कोअरही बघितला जात नाही.
तुमच्या पीपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर केवळ एक टक्का व्याजावर ३ वर्षांसाठी म्हणजेच ३६ महिन्यांसाठी कर्ज मिळणे शक्य आहे. या व्याजाच्या मोबदल्यात तुमच्या खात्यातून कर्जाची रक्कम कापण्यात आलेली असते.
निर्धारित वेळेत कर्ज फेडले नाही तर सहा टक्के व्याजाने कर्ज चुकविण्याची वेळ येते. पीपीएफ खाते उघडल्यानंतर पाचव्या वर्षाला कर्ज घेतल्यास सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये जमा झालेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात मिळते. अर्थात तीन वर्षांमध्ये ४ लाख रुपये जमा झाले असतील तर त्याच्या २५ टक्के म्हणजेच १ लाख रुपयांचे कर्ज मिळते. सध्या पीपीएफ खात्यावर ७.१ टक्के व्याज देण्यात येत आहे.
असे आहेत नियम
कर्ज घेण्यासाठी तुमचे पीपीएफ खाते ३ वर्ष जुने असावे लागते. हे कर्ज पीपीएफ खाते उघडल्यानंतर तिसऱ्या आणि सहाव्या आर्थिक वर्षादरम्यान घेता येते. कोणत्याही महिन्यात कर्जासाठी अर्ज केला तरीही ३१ मार्चपर्यंत जमा असलेल्या रकमेच्या आधारावरच ते मंजूर होते. पहिले कर्ज पूर्ण फेडल्याशिवाय दुसरे कर्ज मिळत नाही.