विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविडरूपी अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या रुग्णांना आता पोस्ट कोविड संबंधित अनेक त्रास सुरू झाले आहेत. पोस्ट कोविड प्रकरणांबाबत दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये संपर्क साधला असता, सरकारी आणि खासगी रुग्णालयात सध्या पोस्ट कोविडशी संबंधित सर्वाधिक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल झालेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बरे झाल्याच्या महिन्यानंतरही काहींना पोटदुखी तर काहींना श्वास घेता येत नसल्याच्या तसेच काहींना ताप येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णांमध्ये अतिकाळजीमुळे मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षणेही दिसत आहेत.
दिल्लीतील करोल बाग परिसरात राहणारे ३० वर्षीय विवेक सचदेवा ऑटोमोबाईल व्यावसायिक आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत त्यांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाले. सात सदस्यीय कुटुंबीयांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. विवेक सध्या राजेंद्र प्लेस येथील बी.एल.के रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल आहेत. गेल्या १२ दिवसांपासून विवेक यांना नेमका काय त्रास होत आहे, हे शोधण्यास डॉक्टर असमर्थ ठरले आहेत. त्यांना १०० अंशाच्या जवळपास ताप आहे. एचआरसीटीसह इतर सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. परंतु त्रासाचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही. फुफ्फुसामध्ये विषाणू आढळलेला नाही. कोविडपश्चात होणार्या त्रासांमधील हे प्रकरण असू शकते, असे डॉक्टर सांगत आहेत.
अशाच प्रकारे २८ वर्षीय जुनैद आणि ३५ वर्षीय विकास कुमार सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल आहेत. दोन्हीही रुग्णांना कोविड होऊन गेलेला आहे. परंतु जुनैदला पल्मोनरी फ्राइब्रोसिसची बाधा झाली आहे. विकास कुमार यांच्या यकृतात पू झाला आहे. तसेच त्यांचे मुत्रपिंड योग्यरित्या कार्यरत नसल्याने त्यांना डायलिसिस दिले जात आहे.
सरकारी रुग्णालयांपैकी एम्समध्ये ८२, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयात १२, आरआमएल रुग्णालयात ७६ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय अपोलो, मॅक्स साकेत, फोर्टिस आणि बी.एल.के.सह मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ३०० हून अधिक पोस्ट कोविडचे रुग्ण दाखल आहेत. बहुतांश रुग्णांच्या ऑक्सिजनच्या पातळीत सुधारणा झाली आहे. तसेच कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु लक्षणे खूपच विचित्र असून, ती समजणे कठिण झाले आहे.
एकाच रुग्णात अनेक लक्षणे
एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पोस्ट कोविड प्रकरणांमध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. पल्मोनरीच्या प्रकरणात एकाच रुग्णामध्ये अनेक लक्षणे दिसत आहेत. अनेकवेळा तपासण्या करूनही योग्य माहिती मिळू शकत नाहीये. सफदरजंग रुग्णालयातील डॉ. विनोद कुमार सांगतात, त्यांच्याकडे दाखल चार रुग्णांमधील आजाराचे योग्य निदान झालेले नाही. नेमका काय त्रास होत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.
जुने आजार पुन्हा गंभीर
नवी दिल्ली येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. अमित सांगतात, त्यांच्या रुग्णालयात पोस्ट कोविडशी संबंधित अनेक रुग्ण दाखल आहेत. गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांचा जीव वाचवल्याच्या काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही रुग्णांना आधीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग होता. अशा रुग्णांचे आजार गंभीर झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तपासण्या नील, परंतु त्रास सुरूच
पोस्ट कोविडदरम्यान अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. रुग्णालयात तपासण्यांदरम्यान काहीच आढळले नाही. डॉक्टरांसाठी ते रुग्ण राहिलेले नाहीत. मात्र तरीही संबंधित व्यक्तींना काहीतरी त्रास होत असल्याचे जाणवत आहे. पूर्वीसारखे त्यांना बरे वाटत नाहीये. अशा प्रकरणांमध्ये रुग्णांना पुरेशा प्रमाणात समुपदेशन करण्याची गरज असून, तसे न केल्यास रुग्ण आणखी भीतीच्या खाईत जाण्याची शक्यता आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओ. पी. शर्मा सांगतात.