नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर टपाल तिकिटास मंजुरी मिळाली असून सन २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या वतीने सन २०२७ च्या वार्षिक अंकात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या टपाल तिकिटाचा समावेश केला आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे दि. ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘अतुल्य भारत’ थीम अंतर्गत अध्यात्मिक सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणाऱ्या वार्षिक अंक कार्यक्रम २०२७ मध्ये स्मारक टपाल तिकिटासाठी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केलेली होती. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
नाशिक भूमी हे अध्यात्मिक तीर्थक्षेत्राचे पूजनीय ठिकाण आहे. याठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा सर्वात मोठा पवित्र उत्सव आहे ज्यामध्ये नाशिकमधील पवित्र गोदावरीच्या काठावर लाखो भाविकांची गर्दी होते. कुंभ हा केवळ धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम नाही तर जगातील ज्योतिषशास्त्रीय, सांस्कृतिक आणि खगोलशास्त्रीय घटना आहे. कुंभला ज्ञानाच्या प्रकाशाचा स्रोत मानले गेले आहे. जेथे भक्त आध्यात्मिक साधक होण्यासाठी भेट देतात आणि शाश्वत आत्म-साक्षात्काराच्या सकारात्मक लहरी अनुभवतात. कुंभमेळा हा खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पवित्रता, धार्मिक रीतिरिवाज आणि सामाजिक-सांस्कृतिक रीतिरिवाज आणि निरीक्षण या विज्ञानाचा वेध घेणारा उत्सव आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे सन २०२७ च्या वार्षिक अंक कार्यक्रमात सामावून घेणारा एक स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प जारी करून साजरा केला जाणे आवश्यक असल्याची छगन भुजबळ यांनी मागणी केली होती.
तसेच या अगोदर सन २०१९ मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यावरील स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर ‘अतुल्य भारत’ थीम अंतर्गत अध्यात्मिक सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणाऱ्या वार्षिक अंक कार्यक्रम २०२७ मध्ये स्मारक टपाल तिकीट मंजूर करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती.